पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडीच्या मैदानावर मालिकेतील दुसरी कसोटी लढत सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३३३ धावा काढून सर्वबाद झाला. यजमान संघ एकवेळ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता, परंतु केशव महाराजच्या फिरकी गोलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले.
केशव महाराजने एकट्याने पाकिस्तानच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह त्याने पाकिस्तानच्या भूमीवर अशी कामगिरी केली ज्यामुळे त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. महाराजने त्याच्या ४२.४ षटकांच्या स्पेलमध्ये १०२ धावा देत एकूण ७ बळी मिळवले. यासह त्याने पाकिस्तानच्या भूमीवर द. आफ्रिकेकडून सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. महाराजच्या फिरकीपुढे यजमान संघाच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. कसोटी कारकिर्दीतील त्याची ही १२वी पाच बळी घेण्याची आणि तिसऱ्यांदा सात किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची किमया ठरली.
या फिरकीपटूने शान मसूद, बाबर आझम, सऊद शकील, सलमान आगा यांसारखे महत्त्वाचे फलंदाज बाद केले. कसोटी संघात पुनरागमन करत असलेल्या केशव महाराजच्या या प्रभावी स्पेलमुळे द. आफ्रिका संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन करण्यात यश मिळवले. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने सर्वाधिक ८७ धावा केल्या.
या शानदार कामगिरीच्या बळावर महाराजने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) नवा विक्रम प्रस्थापित केला. WTC मध्ये तीन वेळा ७ किंवा त्याहून अधिक बळी घेणारा महाराज हा एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा आर. अश्विन, न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि पाकिस्तानचा नोमान अली यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले. इतकेच नव्हे, तर आशिया खंडात ५० बळी पूर्ण करणारा तो द. आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज आणि पहिला फिरकीपटू ठरला आहे.
आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनच्यानंतर आशियामधील मैदानावर एका डावात एकापेक्षा जास्त वेळा सात बळी घेणारा महाराज हा दुसरा गैर-आशियाई गोलंदाज बनला आहे.
पाकिस्तानला ३३३ धावांवर गुंडाळल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. कर्णधार एडन मार्करम चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. तो ३२ धावा काढून बाद झाला. तर, रयान रिकेल्टननेही निराशा केली. तो केवळ १४ धावा काढून तंबूत परतला.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रोटियाज संघ यापूर्वीच ०-१ ने पिछाडीवर आहे. लाहोर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाहुण्या संघाला ९३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत, संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेचा शेवट बरोबरीत नक्कीच करू इच्छितो.