पुढारी ऑनलाईन डेस्क : 381 चेंडूंमध्ये नाबाद 303 धावा, 32 चौकार आणि 4 षटकार... कसोटी सामन्यात ही मॅरेथॉन खेळी साकारली होती टीम इंडियाचा मिडल ऑर्डर फलंदाज करुण नायरने. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतकी खेळी करणारा तो भारताचा फक्त दुसरा फलंदाज ठरला होता. 2016 साली इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत करुणने हा पराक्रम केला होता, तेव्हा असे वाटले की टीम इंडियामध्ये या खेळाडूचे भविष्य उज्ज्वल आहे. पण जे अपेक्षित होते, त्याच्या अगदी उलट घडले.
नायरची 7 वर्षांपूर्वी 2018मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवद झाली होती. पण त्या दौ-यात त्याला बाकावरच बसावे लागले. त्यानंतर तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला. परिस्थिती इतकी बिकट झाली की या प्रतिभावान फलंदाजाला हतबल होऊन ‘मला एक संधी तरी द्या,’ अशी विनंती करावी लागली. तो निराश नक्कीच होता, पण त्याने हार मानली नाही. तो संघर्षा करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला. त्याने रणजी ट्रॉफीसाठी कर्नाटक संघ सोडून विदर्भकडून खेळण्याचा निर्णय घेतला. या नंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
विदर्भाच्या रणजी ट्रॉफी विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने सुमारे 54 च्या सरासरीने 863 धावा फटकावल्या. यामध्ये चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 50-50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 5 शतकांसह 779 धावा केल्या. या 33 वर्षीय फलंदाजाने गेल्या दोन वर्षांत टी-20 फॉरमॅटमध्येही धमाका करून धावांचा पाऊस पाडला आहे. यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने सहा डावांत 177.08 च्या स्ट्राइक रेटने 255 धावा केल्या. तर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक टी-20 लीग महाराजा ट्रॉफीत त्याने 181.82 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 560 धावा करून धावा केल्या. या धमाकेदार खेळींद्वारे नायरने पुनरागमनाचा दृढनिश्चय केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
करुण नायर 2012 आणि 2013 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा भाग होता. त्याला खरी ओळख 2014 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून मिळाली. त्या हंगामात त्याने 142.24 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या. 2016 मध्ये राजस्थान रॉयल्स संघावर बेकायदेशीर सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने नायरचा आपल्या संघात समावेश केला. 2017च्या हंगामात झहीर खान जखमी झाल्यानंतर करुणने 3 सामन्यांमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व केले. 2018च्या आयपीएल लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने तर फेब्रुवारी 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने नायरला विकत घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये तो पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला.
आयपीएलमधून वगळण्यापूर्वीच्या तीन हंगामांमध्ये करुण नायरला केवळ सहाच वेळा फलंदाजीची संधी मिळाली. त्यात त्याने एकूण 38 धावा केल्या. मात्र गेल्या दोन टी-20 देशांतर्गत हंगामांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट सातत्याने वाढत गेला. 2018 नंतर प्रथमच तो 150 च्या पलीकडे गेला. तर 2023 मध्ये तो 152.44 होता. मागील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने 177.08 च्या स्ट्राईक रेटने धावा जमा केल्या आहेत.
2024च्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने करुण नायरला त्याच्या बेस प्राईस 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतले. मात्र, पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याला बेंचवरच बसवण्यात आले. पण जेव्हा तो मुंबईविरुद्ध अरुण जेटली स्टेडियमवर उतरला, तेव्हा त्याने दाखवून दिले की फॉर्म तात्पुरता असतो, पण क्लास कायमचा राहतो. विजय हजारे, रणजी आणि आता आयपीएलमध्ये त्याची फलंदाजी पाहून असे नक्की वाटते की क्रिकेटने या प्रतिभावान खेळाडूला कदाचित एक संधी पुन्हा दिली आहे. आयपीएलच्या 18व्या हंगामात नायरने जोरदार पुनरागमन केले आहे. त्याने सामन्याच्या निकालाची पर्वा केली नाही. मिळालेल्या संधीचे उत्कृष्ट खेळीमध्ये रुपांतर केले. ज्याद्वारे त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठीचा दावा सादर केला आहे.
असं म्हणतात की सगळे दिवस सारखे नसतात.. नायर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला असून फलंदाजीने धमाल करत आहे. त्याने आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. इतके जबरदस्त की ते पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात करुण नायरला दुखापतग्रस्त फाफ डु प्लेसिसच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने मैदानात उतरण्याची संधी दिली. नायरने या संधीचे सोने केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याने रणजी, सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी या सारख्या स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. आता तोच फॉर्म त्याने आयपीएलमध्येही कायम ठेवल्याचे पहायला मिळाले. दिल्लीने 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शून्यावरच झॅक फ्रेझर-मॅकगर्कची विकेट गमावली. त्यानंतर करुण नायर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला आणि अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी रचली.
आयपीएलमध्ये 1077 दिवसांनी म्हणजेच जवळपास तीन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या करुण नायरने मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी अर्धशतक झळकावले. त्याने एमआयचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची चांगलीच खबर घेत धुलाई केली. इतकेच नाही, तर नायरने बुमराहच्या एका षटकातच 2 षटकार आणि 1 चौकार ठोकत 18 धावा वसूल केल्या. आयपीएलमध्ये बुमराहच्या एका षटकात भारतीय फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. तर त्याने बुमराहच्या एकूण 9 चेंडूंचा सामना करत 26 धावा चोपल्या. हा एक विक्रम आहे. याआधी 2020 मध्ये एबी डिविलियर्सने 8 चेंडूंमध्ये 27 धावा कुटल्या होत्या. तर 2016 मध्ये शिखर धवनने बुमराह विरुद्ध 16 चेंडूत 27 धावा केल्या होत्या.
26 धावा : पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स), 2022
20 धावा : ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज), 2018
18 : करुण नायर (दिल्ली कॅपिटल्स), 2025
17 : फाफ डु प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्स), 2021