पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधलेल्या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकने विदर्भ संघाचा ३६धावांनी पराभव केला. कर्नाटकने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४८ धावा केल्या. विदर्भ संघ ३१२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. कर्नाटकने ३६ धावांनी सामना जिंकला. विशेष म्हणजे आजवर कर्नाटक संघाने विजय हजारे ट्रॉफीत कधीच अंतिम सामना गमावला नव्हता. आजही ही परंपरा कायम राखत कर्नाटक संघाने विजय हजारे ट्रॉफीवर पाचव्यांदा आपली मोहोर उमटवली.
३४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची सुरवात खराब झाली मात्र ध्रुव शोरे याच्या दमदार शतकाने डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये हर्ष दुबेच्या फटकेबाजीने विदर्भाच्या विजयाच्या आशा जिवंत राहिल्या होत्या. हर्ष दूबेने ३० चेंडूत ५ चौकार, ५ षटकार फटकावत झंजावती ६३ धावांची खेळी केली. मात्र ती व्यर्थ ठरली ४८.२ षटकात विदर्भाचा डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला. कर्नाटकने ३६ धावांनी विजय मिळवत विजय हजारे ट्रॉफिवर सलग पाचव्यांदा नाव कोरले.
करुण नायरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने महाराष्ट्राचा ६९ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ च्या उपांत्य फेरीत विदर्भ संघाने केला होता. कर्नाटकने उपांत्य फेरीत हरियाणाला पराभूत करत अंतिम सामन्यासाठी आपले स्थान पक्के केले होते. विजय हजारे ट्रॉफी पाचव्यांदा पटकविण्यासाठी कर्नाटकचा संघ तर पहिले विजेतेपदासाठी विदर्भचा संघ वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर आज (दि.१८) उतरले. विदर्भाने नाणेफेक जिंकून कर्नाटकला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
देवदत्त पडिक्कलच्या रूपाने कर्नाटकला पहिला धक्का बसला. १९ चेंडूत ८ धावांवर खेळत असताना सहाव्या षटकात यश ठाकूरने त्याला तंबूत धाडले. यानंतर कर्णधार मयंक अग्रवाल याने अनीश केव्हीसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकने पहिल्या १० षटकात एक गडी गमावत ५० धावांचा टप्पा पूर्ण केला. मयंक अग्रवालने ३१ धावा आणि अनिश केव्हीने २३ धावांचे योगदान दिले. हे दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले. ६३ धावांवरच कर्नाटकने तीन गडी गमावले होते. मात्र यानंतर श्रीजित आणि स्मरन या डावखुऱ्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. या दोघांनी १६० धावांची निर्णायक भागीदारी करत स्मरन रविचंद्रनने सर्वाधिक १०१ धावा केल्या. त्याने ९२ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार फटकावले. अभिनव मनोहरने ७९ आणि कृष्णन श्रीजितने ७८ धावा केल्या. कर्नाटकने विदर्भाला ३४९ धावांचे मोठे लक्ष्य दिले.
विदर्भाचा कर्णधार करुण नायर याने या स्पर्धेत सात सामन्यांमध्ये ७५२ धावा केल्या. यामध्ये पाच शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तो एका डावात वगळता सर्व डावात नाबाद राहिला. अंतिम सामन्यात त्याला कमाल करता आली नाही. त्याने ३२ चेंडूत २७ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेली ही सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
विदर्भ संघ : ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, यश कदम, दर्शन नळकांडे, यश ठाकूर
कर्नाटक संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (यष्टीरक्षक), अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, हार्दिक राज, प्रसीद कृष्ण, वासुकी कौशिक, अभिलाष शेट्टी