पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून त्यातील तिसरी कसोटी सेडन पार्क येथे खेळली जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे तर सेडन पार्कवरील सातवे कसोटी शतक आहे.
विशेष बाब म्हणजे कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग 5 शतके झळकावणारा विल्यमसन हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय सर्वात जलद 33 वे कसोटी शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. तो न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाजही ठरला आहे.
विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. यासह तो एकाच मैदानावर सलग 5 शतके झळकावणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू बनला आहे. त्याने सेडन पार्कवर याआधी बांगलादेशविरुद्ध 200 धावा (2019), इंग्लंडविरुद्ध 104 धावा (2019), वेस्ट इंडिजविरुद्ध 251 धावा (2020), द. आफ्रिकेविरुद्ध नाबाद 133 धावा (2024) फटकावल्या आहेत.
विल्यमसनने आपल्या 186व्या कसोटी डावात 33वे कसोटी शतक पूर्ण केले आहे. सर्वात वेगवान 33 कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो जगातील तिसरा फलंदाज आहे. या यादीत रिकी पाँटिंग पहिल्या आणि सचिन तेंडुलकर दुस-या क्रमांकावर आहे. विल्यमसननंतर युनूस खान आणि स्टीव्ह स्मिथ यांचा क्रमांक लागतो.