डॅलस; वृत्तसंस्था : कर्णधार हॅरी केनचे दोन गोल आणि उत्तरार्धातील ज्युड बेलिंगहॅम व मार्कस रॅशफोर्डच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर इंग्लंडने फिफा विश्वचषक मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. डॅलस येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. क्रोएशियाने दोनदा बरोबरी साधून दिलेल्या धक्क्यांमधून सावरत इंग्लंडने दुसऱ्या सत्रात सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शानदार विजयासह ‘थ्री लायन्स'ने (इंग्लंड संघ) ग्रुप ‘एल’मध्ये अव्वल स्थान पटकावले असून, बुधवारी त्यांचा सामना घानाविरुद्ध होईल.
उत्तरार्धात ‘थ्री लायन्स’चे निर्भेळ वर्चस्व
मध्यंतरानंतर मैदानावर उतरलेला इंग्लंडचा संघ पूर्णपणे बदललेला दिसला. उत्तरार्ध सुरू होताच अवघ्या दुसऱ्या मिनिटाला ज्युड बेलिंगहॅमने उजव्या बाजूने आगेकूच करत चेंडू गोलपोस्टच्या कोपऱ्यात धाडला आणि इंग्लंडला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात तब्बल २२ शॉटस् मारत क्रोएशियावर प्रचंड दबाव आणला. क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविचने काही उत्कृष्ट बचाव केले; परंतु अखेरच्या सत्रात रॅशफोर्डने चौथा गोल करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
कमकुवत बचाव, आक्रमक पवित्रा
युरो २०२४ मधील गॅरेथ साऊथगेट यांच्या बचावात्मक रणनीतीच्या अगदी उलट चित्र यावेळी पाहायला मिळाले. मुख्य प्रशिक्षक थॉमस ट्युचेल यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडचा बचाव पूर्वार्धात कमालीचा डळमळीत आणि चिंताजनक वाटला. त्यांच्या आक्रमक फळीने मात्र क्रोएशियाच्या संरक्षणाची दाणादाण उडवली. हा सामना इंग्लंडच्या चाहत्यांना आनंद देणारा असला, तरी बचावातील चुका ट्युचेल यांच्यासाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरतील.
केनची दुहेरी चमक आणि क्रोएशियाचा पलटवार
सामन्याच्या सुरुवातीलाच कर्णधार हॅरी केनने पुन्हा घेतलेली पेनल्टी आणि डेक्लिन राईसच्या उत्कृष्ट कॉर्नरवर मारलेला हेडर अशा दोन गोलसह इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. मात्र, क्रोएशियाने इंग्लंडच्या बचावातील त्रुटींचा फायदा उठवत पहिल्या दोन शॉटस्वरच गोल डागले. जॉन स्टोन्सच्या चुकीचा फायदा घेत मार्टिन बटुरिनाने पहिला गोल केला. त्यानंतर एझरी कोन्सा आणि जॉन स्टोन्सची जोडी पेटार मुसाला रोखण्यात अपयशी ठरली. यामुळे क्रोएशियाने सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली होती.