K L Rahul  x
स्पोर्ट्स

KL Rahul Century at Lord's | के. एल. राहुलचे शानदार शतक; लॉर्ड्सवर दुसऱ्यांदा केली कामगिरी..

KL Rahul Century at Lord's | 2021 मध्येही लॉर्ड्सवर झळकावले होते शतक; लॉर्ड्सवर दिलीप वेंगसरकर यांची तीन शतके

Akshay Nirmale

K L Rahul Centruy at Lords IND vs ENG third test

लंडन : क्रिकेटमध्ये काही क्षण असतात जे खेळाडूंच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहिले जातात. लॉर्ड्स या क्रिकेट मैदानावरचे शतक हा असाच एक क्षण आहे. हाच ऐतिहासिक क्षण साधत, भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलने "क्रिकेटच्या पंढरीत" म्हणजेच लॉर्ड्सवर एक अफलातून शतक ठोकत फलंदाजी पुन्हा सिद्ध केली. लॉर्ड्सच्या गॅलरीतून उठणारा टाळ्यांच्या कडकडाटातून प्रेक्षकांनी या शतकाला जणू मानवंदनाच दिली.

राहुलने 176 चेंडूत 13 चौकारांच्या सहाय्याने शतक झळकावले.

पंतसोबत महत्वपूर्ण भागीदारी...

राहुलने संयमी खेळी करत इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजीवर नियंत्रण राखले. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर 53 धावांवर नाबाद असलेल्या सलामीवीर कन्नूर लोकेश राहुलने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले.

त्याने उपकर्णधार ऋषभ पंतसोबत साकारलेल्या भागिदारीमुळे भारताचा डावही सावरला गेला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 141 धावांची भागिदारी केली.

के. एल. राहुल 171 चेंडूत 98 धावांवर असताना ऋषभ धावबाद झाला. त्यानंतर सामना लंचब्रेकसाठी थांबवण्यात आला. लंचनंतर सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा काही वेळातच राहुलने शतकाला गवसणी घातली.

राहुलने 2021 मध्येही लॉर्ड्सवर झळकावले होते शतक

के. एल. राहुल याने लॉर्ड्स मैदानावर कसोटीमध्ये यापुर्वी 12 ऑगस्ट 2021 रोजी झळकावले होते. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 250 चेंडूत 129 धावा केलेल्या आणि भारताला मजबूत स्थान मिळवून दिले होते.

ही धावसंख्या त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील एक उल्लेखनीय शतकांपैकी एक आहे .तेव्हा त्याने 250 चेंडूंत 129 धावा फटकावल्या होत्या. त्या खेळीत त्याने 12 चौकार, 1 षट्कार मारला होता.

त्याने तेव्हा रोहित शर्मासोबत रोहित शर्मा सोबत 126 धावांची सलामी भागीदारी केली होती. हा सामना भारताने जिंकला होता. आणि राहुलचे हे शतक लॉर्ड्सच्या Honours Board वर नोंदवण्यात आले.

राहुलची कसोटी कारकिर्द

लोकेश राहुल हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रतिभावान फलंदाज आहे, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत 60 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये 105 डावांमध्ये त्याने 34.58 च्या सरासरीने 3493 धावा केल्या आहेत.

त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर 199 धावा आहे. त्याने 9 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर एकूण 423 चौकार आणि 26 षटकार आहेत, जे त्याच्या आक्रमक आणि तितक्याच संयमी फलंदाजीचे दर्शन घडवतात.

राहुलने विकेटकीपर म्हणून देखील काही सामने खेळले असून त्याचा बहुपर्यायी खेळ संघासाठी उपयुक्त ठरला आहे. त्याच्या कसोटी करिअरमध्ये चढ-उतार आले असले तरी त्याची क्षमता आणि तंत्रज्ञानावर पकड भविष्यात त्याला अधिक यशस्वी बनवू शकते.

(ही आकडेवारी सध्या सुरू असलेल्या सामन्यापुर्वीपर्यंतची आहे)

लॉर्ड्स मैदानावर या भारतीय क्रिकेटर्सनी झळकावले शतक

विनू मंकड - लॉर्ड्स मैदानावर पहिले शतक झळकावणारे भारतीय होते विनू मंकड. त्यांनी 1952 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले. त्यांनी 184 धावा केल्या होत्या. हा आजही भारतासाठी लॉर्ड्सवर सर्वाधिक वैयक्तिक स्कोर आहे.

गुंडाप्पा विश्वनाथ- यांनी 1979 मध्ये 113 धावा केल्या होत्या.

दिलीप वेंगसरकर- हे लॉर्ड्सवर तीन शतक ठोकणारे एकमेव भारतीय क्रिकेटर आहेत. 1979 मध्ये 103, 1982 मध्ये 157, आणि 1986 मध्ये नाबाद 126 धावा त्यांनी फटकावल्या होत्या. त्यांच्या नाबाद 126 धावांमुळे भारताला लॉर्ड्सवर पहिला विजय मिळवता आला होता.

रवी शास्त्री- यांनी 1990 मध्ये लॉर्ड्सवर 100 धावा केल्या होत्या.

मोहम्मद अझरुद्दीन- याने 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर 121 धावा फटकावल्या होत्या.

सौरव गांगुली- याने 1996 मध्ये लॉर्ड्सवर पदार्पणाच्या कसोटीत 131 धावांची खेळी केली होती.

अजित आगरकर- याने 2002 मध्ये लॉर्ड्सवर नाबाद 109 धावा केल्या होत्या. हे त्याचे पहिले व एकमेव कसोटी शतक होते .

राहुल द्रविड- याने 2011 मध्ये लॉर्ड्सवर नाबाद 103 धावा फटकावल्या होत्या.

अजिंक्य रहाणे- याने 2014 मध्ये लॉर्ड्सवर 103 धावांची खेळी केली होती. तो सामना भारताने 95 धावांनी जिंकला होता.

के. एल. राहुल- याने 2021 मध्ये लॉर्ड्सवर 129 धावा फटकावल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT