भारतीय महिला तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम विश्वचषक फायनलमध्ये (Archery World Cup) पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे.  File Photo
स्पोर्ट्स

Archery World Cup : ज्योती वेन्नमने तिरंदाजी विश्वचषक स्‍पर्धेत रचला इतिहास!

उपांत्य फेरीत पराभवानंतर दमदार पुनरागमन करत पदकावर उमटवली मोहोर

पुढारी वृत्तसेवा

Archery World Cup

नानजिंग : भारतीय महिला तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम (Jyothi Surekha Vennam) हिने इतिहास रचला आहे. ती विश्वचषक फायनलमध्ये (Archery World Cup) पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे. शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) चीनमधील नानजिंग येथे झालेल्या स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नमने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या एला गिब्सनविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

सलग १५ वेळा अचूक लक्ष्‍यभेद

२९ वर्षीय आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या ज्योतीने कांस्यपदकाच्या लढतीत गिब्सनचा १५०-१४५ अशा फरकाने पराभव केला. या विजयासाठी तिने सलग १५ अचूक बाण मारले. विश्वचषक फायनलमधील तिचे हे पहिलेच पदक आहे.आठ तिरंदाजांच्या या अंतिम टप्प्यात ज्योतीने अमेरिकेच्या अलेक्सिस रुईजचा उपांत्यपूर्व फेरीत १४३-१४० असा पराभव करत दमदार सुरुवात केली होती.

उपांत्य फेरीत पराभव; पण दमदार पुनरागमन

उपांत्य फेरीत ज्योतीला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराविरुद्ध निसटता १४३-१४५ असा पराभव पत्करावा लागला.तिसऱ्या ‘एंड’नंतर ज्योती ८७-८६ अशा किरकोळ आघाडीवर होती. मात्र बेसेराने चौथ्या ‘एंड’मध्ये तीन ‘१०’ गुण मिळवून ११६-११५ अशी आघाडी घेतली आणि पाचवा ‘एंड’ २९-२८ ने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतरही ज्योतीने कांस्यपदकाच्या लढतीत शानदार पुनरागमन केले.तिने सलग पाच ‘एंड’मध्ये १५ अचूक ‘१०’ गुण मिळवत गिब्सनला सहज पराभूत केले.

यंदा ज्‍योतीची कामगिरी ठरली लक्षवेधी

यापूर्वी तिला ट्लाक्सकाला (२०२२) आणि हर्मोसिलो (२०२३) येथील विश्वचषक फायनलमध्ये लवकर बाहेर पडावे लागले होते.यावर्षी तिची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे.दरम्यान, महिलांच्या कंपाऊंड विभागात भारताची दुसरी पात्र तिरंदाज मधुरा धामणगावकर हिला पहिल्याच फेरीत मेक्सिकोच्या मारियाना बर्नालकडून १४२-१४५ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.या स्पर्धेच्या रिकर्व्ह (Recurve) विभागात कोणत्याही भारतीय तिरंदाजाने पात्रता मिळवली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT