चेन्नई : ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या गट ‘ब’ सामन्यात भारताने ओमानचा 17-0 असा मोठा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताच्या आक्रमणापुढे ओमानचा संघ निष्प्रभ ठरला. भारताकडून दिलराज सिंगने सर्वाधिक चार गोल केले, तर मनमित सिंग आणि अर्शदीप सिंग यांनी हॅट्ट्रिक नोंदवून विजयात मोलाचा वाटा उचलला.
चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच ओमानच्या बचाव फळीला कोणतीही संधी दिली नाही. मैदानावर गोलचा अक्षरशः पाऊस पडला. ओमानचा संघ बचावात पूर्णपणे गोंधळलेला दिसत होता आणि त्यांच्याकडे कोणतीही योजना नव्हती. दोन्ही संघांच्या कौशल्य, क्षमता आणि शारीरिक ताकदीतील फरक स्पष्टपणे दिसून येत होता. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ओमानचे खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले दिसत होते.
भारताची पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची क्षमता बऱ्याच काळापासून चिंतेचा विषय राहिली आहे. मागील महिन्यात सुलतान ऑफ जोहोर चषकातही 53 पैकी केवळ आठ पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करण्यात भारताला यश आले होते. या सामन्यातही भारताला सुरुवातीला पेनल्टी कॉर्नरवर फारसे यश मिळाले नाही; परंतु ओमानचा संघ थकून गेल्यानंतर मात्र भारताने गोलचा सपाटा लावला.
ओमानविरुद्ध भारतातर्फे दिलराज सिंगने चार गोल केले, तर मनमित सिंग आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक हॅट्ट्रिक नोंदवली. याव्यतिरिक्त, अनमोल एक्का आणि अजित यादव यांनी प्रत्येकी दोन गोल केले. गुरजोत सिंग आणि थौनाओजम इंगालेम्बा लुवांग यांनीही गोल करत आपले योगदान दिले. शेवटची 6 मिनिटे शिल्लक असताना शारदा तिवारीने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
कॅनडा वि. जर्मनी (0-7), दक्षिण आफ्रिका वि. आयर्लंड (2-1), चिली वि. स्वित्झर्लंड (2-3), मलेशिया वि. ऑस्ट्रिया (5-1), नेदरलँड वि. इंग्लंड (5-3), फ्रान्स वि. कोरिया (11-1), ऑस्ट्रेलिया वि. बांगला देश (5-3)