मेक्सिको सिटी; वृत्तसंस्था : ‘फिफा विश्वचषक २०२६’च्या सलामीच्या सामन्यात यजमान मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव करत दणक्यात सुरुवात केली. या सामन्यात मेक्सिकोचा स्टार विंगर ज्युलियन क्विनोनेस याने फुटबॉल विश्वातील एका ऐतिहासिक महाविक्रमाला गवसणी घातली आहे. विश्वचषकाच्या ९६ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या ८ व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेच्या बचावातील चुकीचा फायदा उठवत क्विनोनेसने बॉक्सच्या बाहेरून थेट गोल डागला. या गोलसह, फिफा विश्वचषकाच्या इतिहासात 'सलामीचा गोल' (स्पर्धेतील पहिला गोल) करणारा तो उत्तर अमेरिकेतील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९३०, १९५० आणि २०१० मध्ये मेक्सिकोने सलामीचे सामने खेळले होते. परंतु, त्यांना पहिला गोल करता आला नव्हता.
क्विनोनेसचा हा गोल फिफा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यातील आतापर्यंतचा सर्वात जलद (फास्टेस्ट) गोल ठरला आहे. याबाबतीत त्याने जर्मनीचा दिग्गज फिलिप लामचा २००६ मधील ११ व्या मिनिटाला केलेला गोलचा विक्रम मोडीत काढला. सौदी प्रो-लीगच्या २०२५-२६ हंगामात 'अल-कादसिया'साठी ३१ सामन्यांत ३३ गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकणारा क्विनोनेस आता जागतिक पातळीवर चमकला आहे.
स्थानिक चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर यजमान मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा २-० अशा गोलने पराभव केला. मेक्सिकोसाठी ज्युलियन क्विनोनेस आणि राऊल जिमेनेझ यांनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये गोल नोंदवले. हा सामना अत्यंत आक्रमक आणि वादळी ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या स्फेफेलो सिथोले आणि थेम्बा झ्वानी या दोन खेळाडूंना 'रेड कार्ड' मिळाल्यामुळे त्यांना मैदान सोडावे लागले, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ खेळाडूंसह खेळत होता. तर दुसरीकडे मेक्सिकोचा बचावपटू सीझर मॉन्टेसलाही खराब टॅकलसाठी रेड कार्ड दाखवण्यात आले. मेक्सिकोनेही सामना १० खेळाडूंसह संपवला.