स्पोर्ट्स

Jos Buttler : जोस… विक्रमांचा बॉस

Arun Patil

पुढारी ऑनलाईन : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2022 च्या क्वालिफायर 2 सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. शतकवीर जोस बटलर (Jos Buttler) राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद 106 धावा करून बेंगलोरविरुद्ध शतक झळकावले. हे त्याचे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. काल झालेल्या सामन्यात बटलरने विराट कोहलीच्या एका विक्रमाची बरोबरी केली तर एक विक्रम मोडीत काढला.

बटलरने 16 सामन्यांमध्ये 151 च्या स्ट्राईक रेटने 824 धावा

राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आयपीएलच्या या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चार शतके आणि चार अर्धशतकांसह त्याने 16 सामन्यांमध्ये 151 च्या स्ट्राईक रेटने 824 धावा फटकावल्या आहेत.

एकाच हंगामात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम

आपल्या जबरदस्त फॉर्मच्या बळावर त्याने क्लालिफायर 2 सामन्यांत विराट कोहलीचा एका हंगामात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. बटलरने आयपीएल 2022 मध्ये 124 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला आहे. यामध्ये 78 चौकार आणि 45 षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने आयपीएल 2016 मध्ये अशी कामगिरी केली होती. विराटने 83 चौकार आणि 38 षटकारांच्या मदतीने 122 वेळा चेंडू सीमारेषेपार पोहोचवला होता. बटलरने कोहलीचा हाच विक्रम मोडला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणार्‍या खेळाडूंमध्ये बटलरने कोहलीशी केली बरोबरी

जोस बटलरने (Jos Buttler) कोहलीच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणार्‍या खेळाडूंच्या यादीमध्ये बटलरने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. बटलरच्या नावे आता आयपीएलमध्ये पाच शतकांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी चार तर याच हंगामातील आहेत. विराट कोहलीच्या नावावरही पाच आयपीएल शतकांची नोंद आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये सहा शतके ठोकलेली आहेत.

जोस बटलरने आरसीबीविरुद्ध शतकी खेळी केली. त्याने आपली ही खेळी राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार आणि दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्नला अर्पण केली. सामन्यानंतर जोस बटलर म्हणाला, शेन वॉर्न राजस्थान रॉयल्ससाठी खूप प्रभावशाली व्यक्ती आहे. आज तो आमच्याकडे अत्यंत अभिमानाने बघत असेल. 4 मार्च 2022 रोजी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नला राजस्थान रॉयल्सच्या संघमालकांनी आयपीएलच्या पहिल्या हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. वॉर्नने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT