मागील चार वर्षांमध्‍ये ब्रिटनचा फलंदाज जो रुट याने आपल्‍या फलंदाजीतील सातत्‍याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्‍यामुळेच आता सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम ताे मोडित काढेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. (Image source- X)
स्पोर्ट्स

सचिन तेंडुलकरचा 'विश्‍वविक्रम' रूट करणार 'ब्रेक'? शक्‍य की अशक्‍य...

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खेळ कोणताही असो यातील होणारे विक्रम हे अबाधित राहत नाहीत. काळाबरोबर खेळ, खेळाडू आणि विक्रम हे बदलत जातात. भारताचा महान क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेट खेळातील ओळख विक्रमादित्‍य अशीच आहे. सचिनच्‍या नावावर कसोटी आणि वन डे क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्‍याच्‍या नावावर आहे. हा विक्रम मोडणे अशक्‍य आहे, असे मानले जाते;पण मागील चार वर्षांमध्‍ये ब्रिटनचा फलंदाज जो रुट याने आपल्‍या झंझावती खेळीने अनेक दिग्‍गज फलंदाजांना मागे टाकले आहे. त्‍यामुळेच आता सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. जाणून घेवूया हे खरचं शक्‍य आहे की केवळ चर्चा आहे याविषयी...

रुटचे फलंदाजीतील सातत्‍य ठरलं लक्षवेधी 

जो रुटच्‍या कसोटी क्रिकेटमधील आकडेवारीकडे पाहता २०२० पर्यंत त्‍याने ९७ कसोटी सामन्यांत १७ शतके आणि ४९ अर्धशतकांसह ४९.७७ च्या सरासरीने ७,८२३ धावा केल्या होत्या. मात्र मागील चार वर्षांमध्‍ये त्‍याच्‍या फलंदाजीमधील सातत्‍य थक्‍क करणारे आहे. 2020 पर्यंत जो रूट याने कसोटी क्रिकेटमध्ये १७ शतके झळकावली होती. मात्र पुढील चार वर्षांत त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. 2021 मध्ये ६ शतके तर 2022 मध्ये ५ शतके झळकावली. मात्र, 2023 मध्ये तो जास्त कसोटी सामने खेळू शकला नाही. ज्यामुळे त्याला त्या वर्षात दोनच शतके करता आली; पण 2024 मध्ये तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि या वर्षात त्याने आतापर्यंत 4 शतके झळकावण्यात यशस्वी झाला आहे.

इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज

1877 मध्ये कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच 147 वर्षांत जो रूट हा इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. नुकत्‍याच श्रीलंकेविरुद्धच्‍या दुसऱ्या कसोटीत रूटने पहिल्या डावात 33वे कसोटी शतक तर दुसऱ्या डावात 34वे कसोटी शतक झळकावले आहे. 34व्या शतकासह त्याने आपल्‍याच देशातील ॲलिस्टर कुक (33 शतके) यांला मागे टाकले. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. जॉर्ज हॅडली (1939), गूच (1990) आणि वॉन (2004) यांच्या बरोबरीने लॉर्ड्सवरील कसोटीच्या दोन्ही डावात शतके करणारा रूट हा केवळ चौथा फलंदाज ठरला आहे.

दिग्‍गज फलंदाजांच्‍या यादीत  सहावा स्‍थानावर

सध्‍या जो रुट हा ३३ वर्षांचा आहे. सुनील गावस्कर, ॲलिस्टर कूक, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग यासारख्या दिग्गजांच्या यादीत तो सतत वर जात आहे.आतापर्यंत १४६ सामन्यांत (267 डाव) 50.62 च्या सरासरीने 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 12,402 धावा करून कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्‍या यादीत तो सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.

सचिनच्‍या विश्‍वविक्रमापासून किती लांब?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्‍याने आपल्‍या कसोटी क्रिकेटच्‍या कारकीर्दीत २०० सामन्‍यांत ५३.७८ च्‍या सरासरीने ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १५९२१ धावा केल्‍या आहेत. तर ३३ व्‍या वर्षी जो रूट याने केवळ १४५ कसोटी सामन्‍यांमध्‍ये १२३७७ धावा केल्या आहेत. रुटला आता सर्वाधिक कसोटी धावा करण्‍याचा विक्रम मोडण्‍यासाठी केवळ 3,544 धावांची गरज आहे.

इंग्‍लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनणार

यावर्षी जाे रुट आणखी सहा कसोटी सामना खेळणार आहे. सध्‍या ॲलिस्‍टर कूकच्‍या नावावर इंग्‍लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्‍याचा विक्रम आहे. त्‍याने कसोटी क्रिकेटमध्‍ये १२,३७२ धावा केल्‍या आहेत. रुटला हा विक्रम मोडण्‍यासाठी आता केवळ ७१ धावा कमी आहेत. यावर्षी तो आणखी सहा कसोटी सामने खेळणार आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो कूकचा विक्रम तर मोडेलच त्‍याचबरोबर तो सचिन तेंडुलकरच्‍या विक्रमाच्‍या आणखी समीप येईल.

सचिन आणि रुट@१०० कसोटी

कारकीर्दीतील पहिल्‍या १०० कसोटी सामन्‍यातील सचिन आणि रुटच्‍या धावांची तुलनेत मोठा फरक दिसतो. रूटने १०० कसोटी सामन्‍यांतील १८३ डावांमध्‍ये २० शतके आणि ४९ अर्धशतकांसह ५०.३३ च्या सरासरीने ८,५०७ धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकरने 100 कसोटींनंतर 160 डावांत 30 शतके आणि 34 अर्धशतकांसह 57.96 च्या सरासरीने 8405 धावा केल्या होत्या.

सर्वसमावेश खेळीत सचिनच सरस

आकडेवारीवरुन स्‍पष्‍ट होते की, जो रूटच्‍या फलंदाजीत २०२१ पासून कमालीचे सातत्‍य आहे. त्याने आपल्‍या ३२ अर्धशतकी खेळींपैकी १७ खेळींचे रुपांतर शतकांमध्‍ये केले आहे. क्रिकेट हा खेळ आंतरराष्‍ट्रीय पातळीवर खेळणार्‍या १० देशांपैकी सात देशांमध्ये रुटने सरासरी 45 पेक्षा जास्त धावा केल्‍या आहेत. केवळ ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना त्याला संघर्ष करावा लागला असल्‍याचे आकडेवारी सांगते. येथे त्याने 14 सामन्यांत 35.68 सरासरीने नऊ अर्धशतक झळकावत केवळ 892 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने खेळलेल्या सर्व दहा देशांमध्ये धावांची सरासरी ४० पेक्षा अधिक आहे. सचिनने कसोटी सामन्‍यात जगभरातील सर्वच मैदाने गाजवली आहेत. रूटला कसोटी क्रिकेटमध्‍ये सचिनच्‍या धावांशी बरोबरी करण्‍यात मोठा टप्‍पा पार करावा लागणार आहे.

 अशक्‍य नाही, पण...

डिसेंबरमध्ये जाे रुट 34 वर्षांचा होईल. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता. तो पुढील तीन वर्ष सलग खेळेल, असे मानले जाते. या तीन वर्षांमध्‍ये त्‍याने आपल्‍या फलंदाजीत कमालीचे सातत्‍य ठेवले तरच त्‍याला सचिनचा विक्रम मोडण्‍याची संधी असेल. सध्‍या तरी कसोटी सामन्यांमध्‍ये त्‍याचे धावांमधील सातत्‍य हे समकालीन फलंदाजांपेक्षा सरस आहे. २०२० म्‍हणजे मागील चार वर्षांचा विचार करता विराट कोहली, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्‍या पेक्षा रुटने सर्वाधिक म्‍हणजे ५७ कसोटी सामने खेळले आहेत. आता आपल्‍या कारकीर्दीच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यावर त्‍याला झंझावती फलंदाजी कायम ठेवावी लागणार आहे. सचिनच्‍या कसाेटीतील धावांचा विक्रम माेडण्‍यासाठी त्‍याला आणखी 3,544 धावा कराव्‍या लागणार अहेत. यासाठी फलंदाजीमध्‍ये कमालीचे सातत्‍य ठेवले तरच त्‍याला सचिनचा विक्रम मोडण्‍याची संधी असेल. आता क्रिकेटमधील अशक्‍य विक्रम मोडण्‍यासाठी रुटची शक्‍य तितकी सरस कामगिरीवरच सारं काही अवलंबून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT