लंडन; वृत्तसंस्था : जो रूट, ओली पोप व बेन स्टोक्सच्या संयमी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने येथील तिसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर 83 षटकांत 4 बाद 251 धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी जो रूट 191 चेंडूंत 9 चौकारांसह 99 धावांवर, तर बेन स्टोक्स 102 चेंडूंत 3 चौकारांसह 39 धावांवर नाबाद राहिले. भारतातर्फे नितीशकुमार रेड्डीने 46 धावांत 2 बळी घेतले, तर बुमराह व रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.
इंग्लंडने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्राऊली (18) व डकेट (23) स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर रूट व पोप यांनी तिसर्या गड्यासाठी 109 धावांची महत्त्वाची भागीदारी साकारली. जडेजाने पोपला बदली यष्टिरक्षक ज्युरेलकरवी झेलबाद केले, तर या सामन्यात पुनरागमन करत असलेल्या बुमराहने ब्रूकचा त्रिफळा उडवला. यावेळी इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 172 अशी होती. त्यानंतर रूट व स्टोक्स यांनी आणखी पडझड न होऊ देता पाचव्या गड्यासाठी 79 धावांची अभेद्य भागीदारी साक ारली. या लढतीदरम्यान नियमित यष्टिरक्षक ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर गेल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. इंग्लंडच्या अनुभवी जो रूटने यादरम्यान भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पार केला. तसेच, त्याने कारकिर्दीतील 67 वे अर्धशतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या 68 अर्धशतकांच्या विक्रमासमीप मजल मारली.
दिवसातील 14 वे षटक बरेच खळबळजनक ठरले. या षटकातील तिसर्या चेंडूवर बेन डकेटचा अंदाज सपशेल चुकला आणि चेंडू ग्लोव्हजला स्पर्शून मागे गेल्यानंतर पंतने सोपा झेल पूर्ण करत डकेटची खेळी संपुष्टात आणली. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर झॅक क्राऊलीदेखील नितीशचा सावज ठरला. उशिरा स्विंग झालेल्या या चेंडूवर क्राऊलीने यष्टीमागे पंतकडे आणखी एक सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला.
* जो रूट भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावा जमवणारा पहिला फलंदाज ठरला. भारताविरुद्ध सर्वाधिक धावांच्या निकषावर रिकी पाँटिंग 2,555 धावांसह दुसर्या, तर अॅलिस्टर कूक 2,431 धावांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
* 2002 पासून, केवळ दोनच भारतीय वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यांमध्ये डावातील आपल्या पहिल्या षटकात दोन बळी घेतले आहेत. 2006 मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाण, ज्याने हॅट्ट्रिक घेतली होती. त्यानंतर या लढतीत नितीशकुमार रेड्डीने पहिल्याच षटकात 2 बळी घेतले.
* पहिल्या सत्रातील इंग्लंडची 3.32 ही धावगती, ब्रेंडन मॅक्युलमने प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून (जून 2022) त्यांनी प्रथम फलंदाजी केलेल्या 17 प्रसंगांपैकी सर्वात कमी आहे. याआधीची त्यांची नीचांकी धावगती गेल्या वर्षी रावळपिंडी येथे 3.66 होती, जिथे त्यांनी उपहारापूर्वी 30 षटकांत 5 बाद 110 धावा केल्या होत्या.
* यापूर्वी खेळलेल्या सर्वही 20 सामन्यांतील प्रत्येक डावात सिराजनेच पहिले षटक टाकले आहे. त्यापूर्वी, 2023 मधील इंदोरमधील सामन्यात फक्त असे झाले नव्हते. त्यावेळी भारताने दोन्ही बाजूंनी फिरकी आक्रमणावर भर दिला होता.
* इंग्लंडने 28 व्या षटकाच्या दुसर्या चेंडूपासून ते 32 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूपर्यंत इंग्लंडने सलग 28 चेंडू निर्धाव खेळले.
* इंग्लंडला 100 धावा पूर्ण करण्यासाठी 35.4 षटके लागली, जी स्टोक्स-मॅक्युलम पर्वातील त्यांची दुसरी सर्वात संथ कामगिरी आहे. त्यांची सर्वात संथ कामगिरी गेल्या वर्षी राजकोट कसोटीच्या चौथ्या डावात होती, जिथे त्यांना शतक पूर्ण करण्यासाठी 37.2 षटके लागली होती.