भारतीय महिला संघाने नवी मुंबईत सात वेळा विश्वविजेता असलेल्या महिला संघाला धूळ चारली आणि भारतीय क्रिकेटच्या संस्मरणीय दिवसात महिला क्रिकेटचा समावेश झाला. हा सामना बघत असताना मला त्या 2002 च्या नॅटवेस्ट ट्रॉफी सामन्याची आठवण झाली. तसेच मोठे आव्हान, बलाढ्य संघ, आघाडीचे मोहरे बाद झाल्यावर विजयाच्या आशा अंधूक होणे आणि संघातले पराक्रमी सूर्य बाद होऊन मावळतीला गेल्यावर त्या पराभवाच्या संधीप्रकाशात कुणीतरी ध्रुव तार्यासारखे अढळपणे उभे राहून मार्ग दाखवणे आणि त्याला बाकीच्या तार्यांची साथ मिळणे. त्या नॅटवेस्ट ट्रॉफी फायनल आणि या महिला विश्वचषकातल्या उपांत्य सामन्याचे स्क्रिप्ट अगदी सारखे होते. तेव्हा मोहम्मद कैफ ध्रुवतारा होता आणि त्याला युवराजची साथ मिळाली तर इथे जेमिमा रॉड्रिग्ज ध्रुव तारा होती आणि तिला कर्णधार हरमनप्रीत आणि बाकीच्यांची साथ मिळाली. मला आठवतंय त्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या सामन्याला मी जेव्हा लंडनच्या ट्यूबमधून लॉर्डस्वर चाललो होतो तेव्हा एका अनेक क्रिकेट मोसम पाहून डोक्यावरचे पांढरे केस इंग्लिश क्रिकेट हॅटच्या खाली दडवलेल्या एका बुजुर्ग इंग्लिश प्रेक्षकांशी गप्पा मारत होतो. जेव्हा लॉर्डस्ला जायला आम्ही सेंट जोन्स वुड स्टेशनवर उतरलो तेव्हा वेगळे होताना त्याला मी एकच प्रश्न विचारला होता, इंग्लंडला किती संधी आहे? त्याचे उत्तर होते, जर आम्ही तेंडुलकरला चाळीसच्या आत बाद केले तर सामना आमचा आहे. त्या त्याच्या बोलण्यातून तेंडुलकरची महानता नक्कीच दिसते, पण पुढे मैदानावर घडले ते वेगळेच. त्याचप्रमाणे या उपांत्य सामन्यात 338 धावांचा पाठलाग करताना जेव्हा स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा बाद झाल्या तेव्हा खरं तर करोडो भारतीयांच्या आशा मावळल्या होत्या.
भारताने इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला पहिल्या चेंडूपासून सकारात्मक खेळायची आवश्यकता होती. सलामीवीर प्रतीका रावल जायबंदी झाल्याने साधारण वर्षभराने शेफाली वर्माचे संघात पुनरागमन झाले. एकेकाळची धडाकेबाज फलंदाज असलेली शेफाली एक वर्षाने संघात परतल्यावर ते सुद्धा बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळताना दडपणाखाली असणे स्वाभाविक होते. ती बाद झाल्यावर सर्व आशा स्मृती मानधनावर होत्या आणि तिच्या कर्तृत्वाला साजेसे ती खेळत होती, पण ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीप्रमाणे जे साध्या डोळ्यांना दिसले नाही ते टेक्नॉलॉजीला दिसले आणि स्मृती बाद झाली. यावेळी विजयाला 40 षटकांत जवळपास तब्बल 280 धावा हव्या होत्या. हे एव्हरेस्टसारखे आव्हान पेलणे कठीण होते. जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत खेळून खेळून किती खेळतील? त्यांच्या जोडीला अमनज्योत, रिचा शर्मा आणि दीप्ती शर्मा या फौजफाट्यावर या धावा काढायला गरज होती ती कुणीतरी दोघींनी धीरोदात्तपणे मैदानात पाय रोवून उभे राहण्याची आणि त्याचबरोबर धावांचा वेग राखण्याची.
जेमिमा रॉड्रिग्जच्या द़ृष्टीने ही मोठी संधी होती. गेल्या विश्वचषकासाठी तिची निवड झाली नव्हती तेव्हा ती निराशेच्या कालखंडातून गेली होती. त्यानंतर ती पुन्हा संघात अली तेव्हाही तिला स्वतःचे स्थान राखायला कष्ट करावे लागले होते. ना तिचे संघातील स्थान पक्के होते ना फलंदाजीचा क्रम. कधी ती मधल्या फळीत खेळली तर कशी सलामीला. अतिशय संवेदनशील मनाची जेमिमा रोज रात्री अश्रू ढाळत होती, पण हे आसू बने अंगारे ऑस्ट्रेलियाने बघितले. या सामन्यातही जेव्हा नाणेफेक जिंकल्यावर मला अंतिम अकरा खेळाडूंची नावे आणि फलंदाजीचा क्रम असलेली प्रत व्हॉटस्अॅपवर आली तेव्हाही जेमिमाचे नाव पाचव्या क्रमांकासाठी होते. तिला तिसर्या क्रमांकावर बढती मिळाल्याचे तिलाही माहीत नव्हते हे तिने सामन्यानंतर सांगितले. कुणाला हा संघातील सुसंवादाचा प्रश्न वाटू शकतो, पण काही निर्णय हे त्या क्षणाला घ्यावे लागतात. कदाचित पुनरागमन करणारी शेफाली वर्मा लवकर बाद झाली तर इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला अमनज्योतपेक्षा जेमिमा उपयुक्त ठरेल हे ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यावर कर्णधार हरमनप्रीत आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी ठरवले असेल. जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत ही मैदानावरची जोडी म्हणजे जय-वीरूची जोडी स्वभावानेही होती. यांची भागीदारी फुलायला लागली आणि भारताच्या डावाला स्थैर्य आले. भारताच्या डावाची धावसंख्या दोनशेच्या जवळ पोहोचली तेव्हा यांनी धावगती वाढवायला घेतली, पण नेमकी तेव्हाच हरमनप्रीत बाद झाली. या दोघींनी विक्रमी भागीदारी केली खरी, पण तरी अजून 109 धावा विजयला हव्या असल्याने ही भागीदारी ज्योतीची शांत होण्याच्या आधीची फडफड वाटायला लागली. याक्षणी जेमिमाचे टेंपरामेंट हा भारताचा विजय किंवा पराजय ठरवणारा घटक होता. हरमनप्रीतने सामना संपल्यावर सांगितले की जेमिमा किती षटकात किती धावा काढायच्या याचे गणित डोक्यात पक्के मांडून तयार होती. दीप्ती शर्मा आणि रिचा घोषला दुसर्या बाजूने फटकेबाजी करायला लावत जेमिमाने विजयाचे सुकाणू आपल्या हातात ठेवले. भारतीय महिला संघ याआधी अनेक अटीतटीच्या लढतीत पराभूत झाला आहे तो निव्वळ मोक्याच्या क्षणी चुका केल्यामुळे. हा इतिहास बदलला गेला.
परवाच्या विजयानंतर जेमिमाचे सर्व जुने व्हिडीओ पुन्हा समोर यायला लागले आहेत. 1983 च्या विश्वचषक विजयापासून तेंडुलकरसकट अनेकांना प्रेरणा मिळाली. सोळा वर्षांच्या जेमिमाने सकाळी साडेपाच वाजता पराभूत होऊन आलेल्या महिला संघाच्या स्वागताला जाऊन आपली प्रेरणा मिळवली. बांद्य्राच्या या मुलीने 2011 च्या विश्वचषक विजयानंतर तेंडुलकरच्या घरासमोरच्या जल्लोषातही आपले क्रिकेटपटू व्हायचे स्वप्न पाहिले होते. हा सांघिक विजय असला तरी जेमिमाच्या त्या शेवटच्या शंभर धावांच्या पाठलागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या विजयानंतर प्रशिक्षक अमोल मुझुमदार बघून मला अजून एका सामन्याची आठवण झाली तो म्हणजे 2007 चा रणजी करंडक स्पर्धेचा मुंबई विरुद्ध बडोदा उपांत्य फेरीचा सामना. मुंबईचा कर्णधार अमोल मुझुमदार होता आणि मुंबईची दुसर्या डावात अवस्था 5 बाद 0 होती. तेव्हाचे मुंबईचे प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी 5 बाद 0 नावाचे पुस्तक लिहिले आहे. गेल्याच आठवड्यात आम्रेेंशी गप्पा मारताना या पुस्तकाचा विषय निघाला होता. तेव्हा या परिस्थितीतही अमोल मुझुमदारने बडोद्याचा कर्णधार जेकब मार्टिनला सांगितले होते, आम्ही अंतिम सामन्यात जात आहोत आणि ते त्याने खरे करून दाखवले. याच मुंबईच्या विजिगिषू वृत्तीचे प्रात्यक्षिक त्याने एक प्रशिक्षक म्हणून काल संघाकडून करून दाखवले. या विजयाने भारताने अंतिम फेरी गाठली, पण हा विजय जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला नमवल्याने अंतिम सामना जिंकल्याइतकाच मोठा होता. भारतीय संघाला या विजयाने नवा आत्मविश्वास मिळाला आहे. 2024 च्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकासारखेच भारत आणि द.आफ्रिका अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले आहेत. भारतीय महिला बार्बाडोसची पुनरावृत्ती नवी मुंबईत करतील, असा विश्वास या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने निर्माण केला आहे. जेमिमा रॉड्रीग्जने आपली संघातील जागा आणि स्थान हेही या विजयाने पक्के केले. भारताने आजवर जगाला अनेक ‘विश्वसुंदरी’ किताब मिळवून दिले, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर क्रिकेटच्या मैदानात विश्वविजेत्यांना नमवणारी जेमिमा ही नवी ‘विश्वसुंदरी’ ठरली आहे.