पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ॲलेक्स कॅरीला बाद करून आपल्या नावावर पाच विकेट्सची भर घातली. यासह त्याने भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे जसप्रीत बुमराह पर्थ कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळत आहे. कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीतील हा दुसरा कसोटी सामना आहे. यावेळे त्याने पाच बळी घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. बुमराह आता कर्णधार म्हणून पाच बळी घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव आणि अनिल कुंबळे यांनीही अशी कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे.
बिशनसिंग बेदी : 8 वेळा
कपिल देव : 4 वेळा
अनिल कुंबळे : 2 वेळा
विनू मांकड
जसप्रीत बुमराह
बुमराहने उस्मान ख्वाजा (8), नॅथन मॅकस्वीन (10), स्टीव्ह स्मिथ (0), ॲलेक्स कॅरी (21) आणि पॅट कमिन्स (3) यांचे पाच बळी घेतले. याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 150 धावा केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार पलटवार केला. बुमराहशिवाय हर्षित राणाने तीन आणि सिराजनेही दोन विकेट घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला. आता बुमराहला पर्थमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची मोठी संधी आहे.