Jasprit Bumrah Injury Update : श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून गॉले येथे सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. 'बीसीसीआय'च्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मधील सुरुवातीच्या तपासणीनंतर, बुमराहच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास अजूनही पूर्णपणे कमी झालेला नसल्याचे समजते. त्यामुळे त्याला घाईघाईत मैदानात उतरवणे सुरक्षित नसल्याचा निर्णय वैद्यकीय पथक आणि संबंधितांनी घेतला असून, त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
टी-२० विश्वचषकाच्या महत्त्वाच्या टप्प्यात बुमराहच्या गुडघ्याची दुखापत उफाळून आली होती. त्यानंतर 'बीसीसीआय'च्या वैद्यकीय पथकाने त्याला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. ३२ वर्षीय बुमराहने गेल्या महिन्यात ठरल्याप्रमाणे इंजेक्शन घेतले खरे, पण त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.
कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघात घेण्याबाबत चर्चा झाली होती, परंतु वैद्यकीय पथकाने कोणताही धोका पत्करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.बुमराहला पूर्ण वेळ देण्याचे आधीच ठरले होते. त्यामुळेच ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेसाठी रवाना होण्यापूर्वी, ३ ऑगस्टला मुंबईत एकत्र येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता.
"पूर्वी अनेकदा खेळाडूंना घाईघाईत मैदानात उतरवल्यामुळे त्यांची दुखापत अधिक बळावल्याची उदाहरणे आहेत. बुमराहसारख्या मुख्य गोलंदाजाबाबत आपण असा धोका मुळीच पत्करू शकत नाही. त्याच्यासाठी पूर्ण तंदुरुस्ती हाच एकमेव उद्देश आहे, कारण या वर्षात पुढे भरपूर क्रिकेट बाकी आहे. यामध्ये आशियाई खेळ, न्यूझीलंड दौरा आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणारी महत्त्वाकांक्षी 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात बुमराहचा समावेश 'फिटनेस क्लिअरन्स'च्या अटीवर करण्यात आला होता. आता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती लवकरच त्याच्या बदल्यात दुसऱ्या गोलंदाजाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये आकिब नबी (Auqib Nabi) शर्यतीत सर्वात पुढे आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीपूर्वी त्याने भारतीय संघासोबत सराव केला होता, तसेच गेल्या महिन्यात 'इंडिया ए' संघासोबत त्याने श्रीलंका दौराही केला होता.जम्मू आणि काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या २९ वर्षीय आकिब नबीने श्रीलंकेतील दोन सामन्यांत ६ बळी घेतले होते. सध्या भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.