पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या भेदक मार्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भंबेरी उडविणार्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. ताज्या ICC कसोटी क्रमवारीत बुमराह सर्वाधिक रेटिंग मिळवणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये 30 बळी घेतले आहेत. या मालिकेतील तो यशस्वी गोलंदाज ठरला आहे. बुमराहचे 907 रेटिंग आहेत जे भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाचे सर्वोत्तम रेटिंग गुण ठरले आहेत. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीपूर्वी, बुमराहचे रेटिंग गुण 904 होते आणि त्याने सर्वोच्च रेटिंगच्या बाबतीत माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची बरोबरी केली होती. 2016 मध्ये अश्विनने सर्वोच्च रेटिंग (904) मिळवली होती, परंतु आता बुमराहने त्याला आता पिछाडीवर टाकले आहे.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत 200 कसोटी बळी पूर्ण केले. तो कसोटीत सर्वात जलद 200 बळी घेणाऱ्यांमध्ये भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, या यादीत पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये एकच वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने 44 कसोटींमध्ये ही कामगिरी केली. अव्वल स्थानावर असणार्या अश्विनने 37 कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी पूर्ण केले होते. कसोटीमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांबद्दल बुमराह चौथ्या स्थानावर आहे. बुमराहला 200 विकेट्स घेण्यासाठी 8484 चेंडू टाकावे लागले. या यादीत पाकिस्तानचा वकार युनूस पहिल्या क्रमांकावर आहे.