पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 41 व्या सामन्यात 23 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजाला इतिहास रचण्याची संधी असेल. जर बुमराहने या सामन्यात दोन विकेट घेतल्या तर तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. या श्रीलंकन वेगवान गोलंदाजाने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या. बुमराहने आतापर्यंत 137 सामन्यांमध्ये 169 विकेट्स घेतल्या आहेत आणि मलिंगाला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी 2 विकेट्सची आवश्यकता आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंगचे नाव आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 136 सामन्यांमध्ये 127 विकेट्स घेतल्या. मिचेल मॅकक्लेनाघन चौथ्या क्रमांकावर आहे, त्याने 56 सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या. पाचव्या क्रमांकावर किरॉन पोलार्ड आहे, ज्याने एमआयसाठी 179 सामन्यांमध्ये 69 विकेट्स घेतल्या.
बुमराह दुखापतीमुळे या हंगामातील पहिले 4 सामने खेळला नाही. आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून त्याने पुनरागमन केले. आतापर्यंत तो 4 सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने 4 विकेट घेतल्या आहेत. सीएसके विरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात तो चांगल्या लयीत दिसत होता. त्या सामन्यात त्याने 4 षटकांत 25 धावा देऊन एमएस धोनी आणि शिवम दुबे यांचे बळी घेतले. SRH विरुद्धच्या सामन्यातही चांगली कामगिरी करून बुमराह MI चा नंबर 1 गोलंदाज बनू शकतो.
मुंबई इंडियन्सने हंगामाच्या सुरुवातीचे सामने गमावले, पण त्यानंतर हा संघ पुन्हा विजयी मार्गावर आला. त्यांनी शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक नोंदवली. मुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामने जिंकले असून 4 सामने गमावले आहेत. एमआय सध्या 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे.