पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने बुधवारी (दि. 22) नवी क्रमवारी जाहीर केली. गोलंदाजांच्या यादीत भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर आहे. तर रवींद्र जडेजानेही अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या बॉर्डर-गावस्कर कसोटीपूर्वी बुमराहने 907 रेटिंग मिळवून इतिहास रचला होता. हे भारतीय गोलंदाजांमध्ये आयसीसी रँकिंगमधील सर्वोच्च रेटिंग आहे. सध्या त्याचे रेटिंग 908 आहे जे त्याचे सर्वोत्तम रेटिंग आहे.
ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (841 रेटिंग) दुसऱ्या तर द. आफ्रिकेचा कागिसो रबाडा (837) तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड चौथ्या आणि द. आफ्रिकेचा मार्को जॅन्सन पाचव्या स्थानावर आहे. मुल्तान येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सहा विकेट्स घेत पाकिस्तानचा नोमान अली (761) टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे. तो दोन स्थानांनी पुढे जाऊन नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, भारताचा रवींद्र जडेजा कसोटी गोलंदाजांमध्ये 10 व्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमधील टॉप 10 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत फारसे बदल झालेले नाहीत. जडेजा 400 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर द. आफ्रिकेचा मार्को जॅन्सन आहे. त्याचे रेटिंग 294 आहे. बांगलादेशचा मेहदी हसन (284) तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (282) चौथ्या आणि बांगलादेशचा शकिब अल हसन (263) पाचव्या स्थानावर आहे.
कसोटी फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 895 आहे. तर त्याचाच सहकारी हॅरी ब्रुक 876 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या (867), भारताचा यशस्वी जैस्वाल (847) चौथ्या, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (772) पाचव्या स्थानावर आहे.
जैस्वाल व्यतिरिक्त भारताचा ऋषभ पंत कसोटी फलंदाजांमध्ये टॉप-10 यादीत आहे. पण पंतला एक स्थान गमवावे लागले आहे. तो दहाव्या स्थानावर घसरला आहे. खराब फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली 26 व्या स्थानावर आहे. तर शुभमन गिल 22 व्या आणि रोहित शर्मा 43 व्या क्रमांकावर आहे.