अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (दि. २) सुरू झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडीजला पहिल्या डावात पूर्णपणे निष्प्रभ केले.
वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेस याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रभावी मारा करून सामन्याच्या पहिल्या सत्रातच पाहुण्या संघातील निम्मे फलंदाज माघारी धाडले. यानंतर दुसऱ्या सत्रात चहापानापूर्वीच वेस्टइंडीजचा संपूर्ण संघ १६२ धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार बळी घेतले. तर, जसप्रीत बुमराहने तीन बळी मिळवत एका खास विक्रमाची नोंद केली.
बुमराहने वेस्टइंडीजविरुद्ध तिसरा बळी घेताच मायदेशात त्याचे ५० कसोटी बळी पूर्ण झाले. त्याने हा पराक्रम केवळ २४ व्या डावात केला. यासह, तो भारतीय भूमीवर सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा संयुक्तपणे अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. या कामगिरीत बुमराहने भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
या यादीत दुसऱ्या स्थानावर कपिल देव असून, त्यांनी २५ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. याव्यतिरिक्त, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी २७-२७ डावांमध्ये भारतीय भूमीवर ५० कसोटी बळी पूर्ण केले होते.
आशिया चषकात बुमराहला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच त्याने आपल्या जादुई यॉर्कर चेंडूंची प्रभावी झलक दाखवली. त्याने १४ षटके गोलंदाजी करताना ३ च्या इकोनॉमी रेटने ४२ धावा देऊन तीन बळी मिळवले. त्याने जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लिन यांना बाद केले. यासह बुमराह हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत घरच्या मैदानावर ५० बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. त्याच्या आधी रविचंद्रन अश्विन (१४९ बळी) आणि रवींद्र जडेजा (९४ बळी) यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत घरच्या मैदानावर ५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत, परंतु दोघेही फिरकी गोलंदाज आहेत. बुमराहच्या एकूण कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत २२२ बळी झाले आहेत. हा त्याचा ४९ वा कसोटी सामना असून, भारतात तो केवळ १३ वा सामना खेळत आहे.
यापूर्वी इंग्लंड मालिकेदरम्यानही त्याने तीन सामन्यांत १४ बळी मिळवले होते. इंग्लंड दौऱ्यावर त्याने दोन वेळा पाच बळी घेण्याची किमया साधत लॉर्ड्स आणि लीड्स येथील ऑनर्स बोर्डवरही आपले नाव कोरले.
या डावात मोहम्मद सिराज भारतीय भूमीवर आपला पहिला पाच बळींचा हॉल पूर्ण करण्यापासून वंचित राहिला. त्याने १४ षटकांत ४० धावा देत चार बळी घेतले. त्याचबरोबर, बऱ्याच कालावधीनंतर भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या कुलदीप यादवनेही विकेट्स मिळवल्या. वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. वेस्टइंडीजकडून एकाही फलंदाजाला ४० धावांचा टप्पा गाठता आला नाही. जस्टिन ग्रीव्सने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली.