Bumrah Available For Asia Cup
मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी आणि देशभरातील चाहत्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आगामी आशिया चषकासाठी उपलब्ध असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहने स्वतः निवड समितीशी संपर्क साधून आपण स्पर्धेत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे कळवले आहे. आगामी आशिया चषक स्पर्धा दि. 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत यूएईत खेळवली जाणार आहे.
अलीकडेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातून बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेत केवळ तीन सामने खेळण्याच्या त्याच्या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. भारताने त्याच्या अनुपस्थितीत ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर ही टीका आणखी वाढली होती. माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी तर एका स्तंभात लिहिले होते की, जर एखादा खेळाडू मालिकेत सर्व सामने खेळू शकत नसेल, तर संघ व्यवस्थापनाने त्याच्या पलीकडे विचार करायला हवा आणि पूर्णपणे तंदुरुस्त व खेळण्यास उत्सुक असलेल्या खेळाडूंना संधी द्यायला हवी.
वर्कलोड मॅनेजमेंटबाबतीत टीकेच्या पार्श्वभूमीवर बुमराहने स्वतःहून आशिया चषकासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती उद्या (मंगळवार, दि. 19) मुंबईत बैठक घेणार आहे. या बैठकीत आशिया चषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघांची निवड केली जाईल.
बुमराह केवळ एक गोलंदाज नाही, तर तो भारतीय वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाचा कणा आहे. त्याची अनोखी गोलंदाजीची शैली, अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता आणि विशेषतः स्लॉग ओव्हर्समध्ये धावा रोखण्याचे त्याचे कौशल्य त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. त्याच्या अनुपस्थितीत संघाला अपवाद वगळता अनेकदा अखेरच्या षटकांमध्ये अनुभवी, हुकमी गोलंदाजाची उणीव भासली आहे. त्यामुळे त्याचे पुनरागमन विशेष महत्त्वाचे ठरू शकते.
संघ व्यवस्थापनाच्या द़ृष्टीने आशिया स्पर्धेकडे आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीची एक महत्त्वाची पायरी म्हणूनही बघितले जात आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी बुमराहला पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळणे आवश्यक आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याच्या वर्कलोडचे नियोजन करताना या दीर्घकालीन उद्दिष्टाचा नक्कीच विचार करेल, हे स्पष्ट आहे.
आशिया चषकात भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यजमान यूएईविरुद्ध होणार आहे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर रंगणार आहे.