Jasprit Bumrah Smriti Mandhana ICC Award
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना हे जून महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. Twitter
स्पोर्ट्स

बुमराह-मानधना ‘ICC प्लेयर ऑफ द मंथ’! भारतीय खेळाडूंनी रचला इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah ICC Award : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला जून महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारताच्या स्मृती मानधना हिला महिला गटात हा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच हा पुरस्कार एकाच देशाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंना जाहीर झाल्याने मोठा विक्रम रचला गेला आहे.

बुमराहने हिटमॅन रोहितला टाकले मागे

बुमराहसह रोहित शर्मा आणि अफगणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज यांना जून महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. पण बुमराहने या दोन्ही खेळाडूंना मागे टाकून बाजी मारली. त्याने टी-20 विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली आणि 15 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. हिटमॅन रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. तर रहमानउल्ला गुरबाजने अफगाणिस्तानसाठी चमकदार कामगिरी केली होती. गुरबाजच्या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.

टी-20 विश्वचषकाचा ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’

जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत बुमराहने धमाकेदार कामगिरी केली. त्याच्या भेदक मा-यापुढे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्याच मा-याच्या जोरावर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करून सामने जिंकले. संपूर्ण स्पर्धेत बुमराह संयुक्तपणे तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या या लक्षवेधी कामगिरीची दखल घेत त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बुमराहने 8 सामन्यांच्या 8 डावात 8.26 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 4.17 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने 15 बळी घेतले. त्याच्याशिवाय एनरिक नोरखियानेही या स्पर्धेत 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या. फजलहक फारुकी आणि अर्शदीप सिंग यांनी संयुक्तपणे प्रत्येकी सर्वाधिक 17 बळी घेतले.

‘आयसीसीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आनंदीत आहे. टी-20 विश्वचषकाच्या संस्मरणीय विजेतेपदानंतर हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे. टीम इंडियाने स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आणि शेवटी ट्रॉफी उंचावली तो प्रसंग अतिशय खास आहे. मी त्या आठवणी नेहमी माझ्यासोबत ठेवीन. आमचा कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाण फलंदाज रहमानउल्ला गुरबाज यांच्या चमकदार कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो.’
जसप्रीत बुमराह

स्मृती ठरली महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

महिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने जिंकला. तिने जूनमध्ये द आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 113, 136 आणि 90 धावांची खेळी खेळली होती. याशिवाय एकमेव कसोटी सामन्यातही तिने शतकी (149) तडाखा दिला होता. मानधनाने हा पुरस्कार जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि भविष्यातही संघाला विजय मिळवून देण्यासाठी ती अशीच भूमिका बजावत राहील, अशी भावना व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT