सिडनी : पाकिस्तान क्रिकेटमधील अनागोंदी आणि सततच्या पराभवांवर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांनी अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तान क्रिकेटच्या सध्याच्या दुरवस्थेला त्यांनी मुख्य निवडकर्ते आकिब जावेद यांना जबाबदार धरले असून, पाकिस्तान संघात रोज कपडे बदलावेत तशा योजना बदलल्या जात असल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.
इंग्लंड दौऱ्यातील हेडिंग्ले आणि लॉर्ड्स येथील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांची तडकाफडकी हकालपट्टी केली, तसेच सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले; या संपूर्ण पार्श्वभूमीवर गिलेस्पी यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गिलेस्पी यांनी २०२४ मध्ये आठ महिने पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यांच्याच कार्यकाळात पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, नुकतेच आकिब जावेद यांनी पाकिस्तान क्रिकेटच्या सध्याच्या खालावलेल्या दर्जासाठी गिलेस्पी आणि मर्यादित षटकांचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना जबाबदार धरले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना गिलेस्पी म्हणाले की, आकिब जावेद यांनी इतरांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतः आरशात पाहावे. संघ निवडीत कोणताही सातत्यपूर्ण दृष्टिकोन उरलेला नसून, विशेषतः आकिब जावेद यांच्या कार्यकाळात निवडीबाबतचे धोरण भरकटलेले दिसते, असा थेट आरोप त्यांनी केला.
जावेद यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार करताना गिलेस्पी म्हणाले की, आकिब जावेद गेल्या दोन वर्षांपासून मुख्य निवडकर्ते म्हणून कार्यरत आहेत. आम्ही दोघेही सध्या त्या यंत्रणेचा भाग नसतानाही संघाच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडणे हास्यास्पद आणि अतार्किक आहे. स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याऐवजी इतरांवर दोषारोप करणाऱ्या जावेद यांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
याशिवाय, पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अत्यंत ढिसाळ आणि असंवेदनशील प्रशासनावरही गिलेस्पी यांनी बोट ठेवले. संघातून खेळाडूंना वगळताना त्यांच्याशी कोणताही थेट संवाद साधला गेला नाही. निवडकर्ते किंवा मंडळाकडून पूर्वकल्पना न मिळता, आपल्याला संघातून वगळण्यात आल्याचे खेळाडूंना कुटुंब, मित्रपरिवार आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समजले. राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हा अत्यंत अपमानास्पद प्रकार असून, पाकिस्तान क्रिकेट प्रशासनाचा हा भोंगळ कारभार खेळाडूंचे मनोधैर्य खचवणारा असल्याचे सांगत गिलेस्पी यांनी मंडळाच्या व्यावसायिकतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.