पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) गेल्या महिन्यात शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर तो निवृत्त झाला. पण 42 वर्षीय अँडरसनने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर त्याने निवृत्तीनंतर टी-20 फॉरमॅट खेळण्याचा इरादा व्यक्त केला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेतही मला खेळायचे आहे अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे. त्याने अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही, पण त्याने नक्कीच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
अँडरसन (James Anderson) हा जगातील सर्वाधिक कसोटी बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. एकूण यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर अँडरसनने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 बळी आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2015 मध्ये शेवटचा एकदिवसीय आणि 2009 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला. निवृत्तीनंतर, अँडरसन वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून इंग्लंड संघात सामील झाला. या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.
अँडरसन (James Anderson) दीर्घकाळ मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळला नसला तरी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात तो छोट्या फॉरमॅटमध्ये संधी शोधत आहे. वृत्तानुसार अनुभवी गोलंदाज म्हणणे आहे की, ‘छोट्या फॉरमॅटमध्ये खेळण्याचे स्वारस्य आहे कारण मी यापूर्वी कोणत्याही फ्रँचायझीसाठी खेळलेलो नाही. या वर्षी द हंड्रेड पाहिल्यावर आणि बॉल स्विंग होताना पाहून मला वाटते की मी त्यात चमकदार कामगिरी करू शकेन. मी कदाचित थोडासा नकार देत आहे कारण मला चांगले माहित आहे की मी पुन्हा कधीही इंग्लंडसाठी खेळणार नाही परंतु मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.’
अँडरसनने कारकिर्दीतील शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर खेळला. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात 3 बळी घेतले.