पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोव्हिच ( Novak Djokovic ) याच्या नावावर आजवर अनेक विक्रमांची नोंद झालेली आहे. तब्बल २४ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदावर त्याने आपली माेहाेर उमटवली आहे. आता मियामी ओपन ( Miami Open ) विजेतेपद पटकावत कॉनर्स-फेडररच्या 'क्लब'मध्ये स्थान मिळवण्याची संधी त्याला होती. मात्र अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकचा स्टार टेनिसपटू जाकुब मेन्सिक (Jakub Mensik) याने जोकोविचला पराभूत करून मियामी ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मेन्सिकने ७-६(४), ७-६(४) असा विजय मिळवला आणि जोकोविचच्या शंभराव्या व्यावसायिक विजेतेपदाचे स्वप्न भंगले.
मियामी ओपन विजेतेपदसाठी १९ वर्षीय आणि जागतिक क्रमवारीत ५४ व्या क्रमांकावर असलेल्या मेन्सिक याचे जोकोविच याच्यासमोर आव्हान होते. आतापर्यंत तब्बल २४ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचने अंतिम सामन्यात महत्त्वाच्या क्षणी अनेक चुका केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. सामना साडेपाच तास उशिराने सुरू झाला. दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले, परंतु मेन्सिकने जोकोविचवर ७-६(४), ७-६(४) अशी मात केली.
जोकोविचने हा सामना जिंकला असता तर तो जिमी कॉनर्स आणि रॉजर फेडररच्या क्लबमध्ये सामील झाला असता. कॉनर्सने त्याच्या कारकिर्दीत १०९ व्यावसायिक पदके जिंकली होती. तर फेडररने १०३ व्यावसायिक पदके जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाहोता. हे दोघेही ओपन एरामधील एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी १०० किंवा त्याहून अधिक करिअर जेतेपदे जिंकली आहेत.
मियामी ओपन विजेतेपदसाठी आमने-सामने आलेल्या मेन्सिक आणि जोकोविच यांच्यात १८ वर्षे आणि १०२ दिवसांचे अंतर होते. १९७६ नंतर कोणत्याही एटीपी-१००० पातळीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीतील हे दोन खेळाडूंमधील सर्वांधिक अंतर होते. यापूर्वी हा विक्रम २००५ च्या मॉन्ट्रियल मास्टर्सच्या आंद्रे अगासी आणि राफेल नदाल यांच्यातील अंतिम सामन्याच्या नावावर होता. त्यावेळी अगासी ३५ वर्षांचा होता तर नदाल १९ वर्षांचा होता. अंतिम सामन्यात दोघांमधील वयाचे अंतर १६ वर्षे ३५ दिवसांचे होते.
सामन्यानंतर बोलताना जोकोविच म्हणाला की, . "मला जास्त बोलायचे नाही. हा जॅकबचा क्षण आहे. आजचा दिवस मेन्सिक आणि त्याच्या कुटुंबासाठी खास एक क्षण आहे. ही एकय अविश्वसनीय स्पर्धा होती. मेन्सिक याने चांगली कामगिरी केली. त्याची सर्व्हिस भेदन हा खूपच आव्हानात्मक होते. त्याने अप्रतिम खेळ केला. येणाऱ्या काळात तू अनेकवेळा भेदक सर्व्हिसचा वापर करशील. कदाचित तू पुढच्या वेळी आम्ही खेळू तेव्हा मला जिंकू देशील."
मियामी ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अव्वल मानांकित सबालेंकाने चौथ्या मानांकित अमेरिकेच्या पेगुलाचा ७-५, ६-२ असा पराभव करून पहिल्यांदाच मियामी ओपनचे विजेतेपद जिंकले. तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या सबालेंकानेही यूएस ओपन २०२४ च्या अंतिम फेरीत पेगुलाचा ७-५, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.होता पुरुष दुहेरीत मार्सेलो अरेव्हालो आणि मेट पेव्हिक या अव्वल मानांकित जोडीने सहाव्या मानांकित ज्युलियम कॅश आणि लॉयड ग्लासपूल जोडीचा ७-६, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.