बेंगळुरू : दुलीप करंडक २०२६ च्या अंतिम लढतीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत साउथ झोनने नॉर्थ झोनचा ७ गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट्रल झोनला नमवून इशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोनने आधीच अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते.
त्यामुळे ६ सप्टेंबरपासून चेन्नईच्या प्रतिष्ठित एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम सामन्यात तिलक वर्माचा साउथ झोन आणि इशान किशनचा ईस्ट झोन यांच्यात जेतेपदासाठी काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. २३ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत ही मजल मारली आहे.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात नॉर्थ झोनचा पहिला डाव अवघ्या १७५ धावांवर आटोपला. नॉर्थ झोनकडून कामरान इक्बालने सर्वाधिक ७६ धावा केल्या, तर साउथ झोनच्या विदवथ कवेरप्पाने अचूक मारा करत ४ बळी टिपले. या प्रत्युत्तरात साउथ झोनने कर्णधार तिलक वर्माच्या नाबाद ११६ धावांच्या शतकी खेळीच्या आणि श्रेयस गोपाळच्या ८७ धावांच्या बळावर पहिल्या डावात ३१२ धावा रचून १३७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. नॉर्थ झोनकडून गुरनूर ब्रारने ४ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात नॉर्थ झोनने सनत सांगवानच्या ७६ आणि आयुष दोसेजाच्या ५२ धावांच्या जोरावर २९७ धावा उभ्या केल्या. साउथ झोनच्या एम. डी. निधिशने ५६ धावांत ५ फलंदाजांना माघारी धाडले.
विजयासाठी मिळालेल्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साउथ झोनची सुरुवात दमदार झाली. रिकी भुई (४२) आणि एन. जगदीशन (४३) यांनी ६४ धावांची सलामी दिली. शेख रशीद (१) स्वस्तात बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे कर्णधार तिलक वर्मा आणि समरण रविचंद्रन यांनी हाती घेतली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८० धावांची अतूट भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या तिलक वर्माने दुसऱ्या डावातही ७९ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५१ धावांची संयमी खेळी साकारली, तर समरणने नाबाद ३२ धावांचे उपयुक्त योगदान दिले.
या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक खेळींच्या क्रमवारीत ईस्ट झोनच्या फलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. १६७ धावांची खेळी करणारा शाहबाज अहमद अव्वल स्थानी असून, १४६ धावांसह सुदीप कुमार घारामी दुसऱ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीतील नाबाद ११६ धावांच्या जोरावर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चौथ्या स्थानी ९६ धावांसह मुशीर खान, तर पहिल्या उपांत्य फेरीत सेंट्रल झोनविरुद्ध ९२ धावांची खेळी करणारा वैभव सूर्यवंशी पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय श्रेयस गोपाळ (८७ धावा), सनत सांगवान (७६ धावा) आणि ऋतुराज गायकवाड (६६ धावा) यांचाही प्रमुख फलंदाजांच्या यादीत समावेश आहे.
ईस्ट झोनच्या संघात कर्णधार इशान किशन आणि उदयोन्मुख फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यासह वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही समावेश असल्याने संघाची ताकद दुणावली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकही सामना न गमावणाऱ्या इशान किशनचे पारडे जड मानले जात असले, तरी सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साउथ झोन त्यांना कडवे आव्हान देईल यात शंका नाही. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेले दोन्ही मातब्बर संघ समोरासमोर येत असल्याने ही खिताबी लढत अत्यंत रंगतदार आणि थरारक होण्याची चिन्हे आहेत.