Ishan Kishan Fifty T20 World Cup Warm Up: टी20 क्रिकेटमध्ये एका झटक्यात सामना फिरवण्याची क्षमता असलेला ईशान किशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी ICC T20 World Cup 2026 आधी भारताच्या वॉर्म-अप सामन्यात ईशानने अवघ्या 20 चेंडूंमध्ये 53 धावा ठोकत तुफानी अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने सात षटकार आणि दोन चौकार लगावत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
4 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वॉर्म-अप सामना झाला. या सामन्यात भारताकडून सलामीची जबाबदारी अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी सांभाळली. यावेळी ईशानने संजू सॅमसनच्या जागी ओपनर म्हणून मैदानात उतरताच आक्रमक फलंदाजी केली.
डावाच्या सुरुवातीपासूनच ईशान आक्रमक मूडमध्ये दिसत होता. दुसऱ्याच चेंडूवर त्याने लुंगी एन्गिडीला षटकार ठोकत खाते उघडले. त्यानंतर पाचव्या षटकात एनरिक नॉर्कियाच्या ओव्हरमध्ये त्याने सलग 6,6, 4 आणि 6 असे फटके मारत तब्बल 22 धावा काढल्या. सहाव्या षटकात क्वेना मफाकाला षटकार ठोकत ईशानने फक्त 20 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि स्टेडियममध्ये जल्लोष केला.
डावखुरा विकेटकीपर फलंदाज असलेला ईशान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही त्याने सातत्याने धावा केल्या होत्या. त्याच लयीचा प्रत्यय या वॉर्म-अप सामन्यातही आला. केवळ 20 बॉलमध्ये 53 धावांची त्याची खेळी पाहता, वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मासोबत सलामी करण्यासाठी तो पूर्णपणे तयार असल्याचं चित्र आहे.
या खेळीने निवड समितीसमोर ईशानने आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये झटपट धावा काढण्याची गरज असते आणि ईशानकडे ती क्षमता आहे. पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकणं, हीच त्याची मोठी ताकद आहे.
टी20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत भारताला आक्रमक सुरुवात करुन देणारा ओपनर महत्त्वाचा ठरणार आहे. ईशान किशनची ही खेळी केवळ एक अर्धशतक नव्हे, तर प्रतिस्पर्धी संघांला इशाराच आहे. फॉर्ममध्ये असलेला ईशान मैदानात उतरला, तर तो एकट्याच्या जोरावर सामना फिरवू शकतो, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.
थोडक्यात सांगायचं तर, वर्ल्ड कपआधी ईशान किशनने धमाकेदार फलंदाजी केली आहे. 6,6,6,6… असा षटकारांचा पाऊस पाडत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे, आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये तो भारतासाठी ‘गेम-चेंजर’ ठरू शकतो.