तेहरान : आगामी फिफा विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर इराणच्या फुटबॉल संघाने आपला सराव तळ अमेरिकेतील ॲरिझोना येथून मेक्सिकोमधील तिजुआना येथे हलवण्याचा निर्णय घेतला असून, जागतिक फुटबॉल नियामक संस्था फिफा (FIFA) कडून या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. लॉजिस्टिक व्यवस्थापन, प्रवासावरील निर्बंध आणि व्हिसाशी संबंधित समस्यांमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इराण फुटबॉल फेडरेशनचे (FFIRI) अध्यक्ष मेहदी ताज यांनी इस्तंबूलमध्ये फिफाच्या अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आणि त्यानंतरच्या वेबिनारमध्ये या निर्णयाची पुष्टी केली आहे.
इराणच्या फुटबॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेदरम्यान थेट अमेरिकेतून कामकाज चालवताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी हे या स्थलांतराचे मुख्य कारण आहे. खेळाडू, तांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक पथकासाठी अमेरिकेत प्रवेश करताना व्हिसा आणि प्रवासाशी संबंधित समस्या उद्भवू नयेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तिजुआना येथे सराव तळ उभारल्यास प्रवासाची व्यवस्था अधिक सुलभ होईल आणि 'इराण एअर'च्या थेट विमानसेवांचा लाभ घेणेही शक्य होणार आहे.
तिजुआनाचे भौगोलिक स्थान इराणसाठी धोरणात्मकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. अमेरिकेच्या सीमेपासून अगदी जवळ आणि सॅन डिएगोच्या शेजारी असलेल्या या शहरातून, इराणच्या गट साखळी सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. तिजुआना ते लॉस एंजेलिसचा विमान प्रवास अवघ्या एका तासापेक्षा कमी वेळेचा आहे. यामुळे ॲरिझोनातील टक्सन येथे असलेल्या मूळ तळाच्या तुलनेत संघाचा प्रवासातील वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.
इराणचा विश्वचषकातील गट साखळी सामन्यांचा कार्यक्रम
सराव तळ मेक्सिकोत हलवला असला तरी, इराणचे ग्रुप 'जी' मधील सर्व सामने अमेरिकेतच खेळले जाणार आहेत. संघाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
१५ जून: विरुद्ध न्यूझीलंड (सोफी स्टेडियम)
२१ जून: विरुद्ध बेल्जियम (सोफी स्टेडियम)
२६ जून: विरुद्ध इजिप्त (लुमेन फील्ड)
२०२६ चा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. अशा परिस्थितीत, इराणच्या सहभागावरून निर्माण झालेली राजकीय संवेदनशीलता या स्थलांतराच्या निर्णयातून अधोरेखित होते. काही दिवसांपूर्वीच, कॅनडाने फिफा काँग्रेसपूर्वी इराण फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मेहदी ताज यांना प्रवेश नाकारला होता. ताज यांचे 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) या संघटनेशी कथित संबंध असल्याचा ठपका ठेवत कॅनडाने ही कारवाई केली होती. विशेष म्हणजे, कॅनडाने २०२४ मध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
अशा प्रकारच्या वादांमुळे आणि राजकीय तणावामुळे इराणच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी, इराणच्या फुटबॉल अधिकाऱ्यांनी 'टीम मेली' (इराणचा फुटबॉल संघ) विश्वचषकात निश्चितपणे सहभागी होईल, असा ठाम पवित्रा घेतला आहे. 'अल जझीरा'च्या वृत्तानुसार, इराण फुटबॉल फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, "आम्ही २०२६ च्या विश्वचषकात नक्कीच सहभागी होऊ, मात्र आयोजकांना आमच्या चिंतांची दखल घ्यावी लागेल." त्याचबरोबर, "आमची संस्कृती, विश्वास आणि विचारसरणीशी तडजोड न करता आम्ही स्पर्धेत उतरू," असेही फेडरेशनने ठणकावून सांगितले आहे.