RCB vs SRH LIVE Score | इशान किशनची वादळी खेळी! 
स्पोर्ट्स

RCB vs SRH LIVE Score | इशान किशनची वादळी खेळी! हैदराबादचे बेंगळुरूला विजयासाठी 202 धावांचे आव्हान

हैदराबादचे बेंगळुरूला विजयासाठी 202 धावांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर ; वृत्तसंस्था : जागतिक लीग क्रिकेटमधील सर्वांत श्रीमंत आणि प्रभावशाली लीग असणार्‍या आयपीएल 2026 स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने (एसआरएच) 20 षटकांत 9 बाद 201 धावा काढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले.

हैदराबादचा कर्णधार इशान किशनने वादळी खेळी करत आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. त्याने केवळ 38 चेंडूंत 80 धावा काढल्या. त्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. इशानने हेन्रिक क्लासेनसह भागीदारी करत संघाचा डाव सावरला. क्लासेनने 22 चेंडूंत 2 चौकार 1 षटकारासह 31 धावा केल्या.

येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर एसआरएच आणि आरसीबी यांच्यातील सलामीच्या सामन्याने आयपीएलला शनिवारी प्रारंभ झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या प्रारंभीच आरसीबीचा गोलंदाज जेकब डफी याने सुरुवातीला हैदराबादला तीन मोठे धक्के दिले होते. त्याने ट्रॅव्हिस हेड (11), अभिषेक शर्मा (7) आणि नितीश रेड्डी (1) यांना स्वस्तात बाद करून हैदराबादची अवस्था 3 बाद 29 अशी केली होती.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर कर्णधार इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन यांनी डाव सावरला. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. कर्णधार इशान किशनने केवळ 27 चेंडूंत 50 धावा पूर्ण केल्या. क्लासेन 31 धावांवर शेफर्डच्या चेंडूवर सॉल्टकडे झेल देऊन बाद झाला. इशान किशनला अभिनंदन सिंगने बाद केले. सॉल्टने इशानचा अवघड झेल टिपून त्याची वादळी खेळी संपुष्टात आणली. अनिकेत वर्माने फटकेबाजी करताना केवळ 18 चेंडूंत 43 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार, 4 षटकार मारले. आरसीबीकडून जेकब डफीने 3, रोमारिओ शेफर्डने 3 गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

पडिक्कल ठरला पहिला इम्पॅक्ट प्लेअर

आरसीबीने या सामन्यात आपल्या वाटणीचा इम्पॅक्ट प्लेअर वापरला असून, वेगवान गोलंदाज जेकब डफीच्या जागी फलंदाज देवदत्त पडिक्कलला मैदानात उतरवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT