अबुधाबी; वृत्तसंस्था : आगामी ‘आयपीएल’ हंगामासाठी आज (मंगळवार दि. 16) मिनी लिलाव होत असून, आघाडीच्या अष्टपैलूंना करारबद्ध करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्जचे संघ आपल्या पैशाची तिजोरी उघडतील, असे स्पष्ट संकेत आहेत. या मिनी लिलावासाठी ‘केकेआर’कडे 64.30 कोटी, तर चेन्नईकडे 43.40 कोटी रुपये उपलब्ध असतील. यामुळे याच दोन संघांत मुख्य खेळाडूंसाठी अधिक जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता लिलाव सुरू होईल.
अष्टपैलू खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी बरीच रस्सीखेच रंगणार असून, याचा सर्वाधिक लाभ कॅमेरून ग्रीनला मिळू शकतो. या लिलावासाठी 10 संघांकडे एकूण 237.55 कोटी रुपये उपलब्ध असून, या रकमेतून 77 खेळाडू करारबद्ध केले जाणार आहेत. यापैकी मुंबई इंडियन्सकडे केवळ 2.75 कोटी रुपये असतील. यामुळे यात किमान किमतीत काही नवोदित खेळाडूंना खरेदी करण्यापलीकडे त्यांची फारशी भूमिका असणार नाही. ग्रीनसह, अष्टपैलू वेंकटेश अय्यर आणि इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन यांनाही मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
ग्रीनला केवळ 18 कोटीच मिळणार?
कॅमेरून ग्रीन आपला राष्ट्रीय सहकारी मिचेल स्टार्कला (24.75 कोटी) मागे टाकून ‘आयपीएल’ लिलावात सर्वाधिक किंमत मिळवणारा विदेशी खेळाडू बनू शकतो. मात्र, लिलावाशी संबंधित एक अट यात अडचणीची ठरू शकते. ग्रीनसाठी 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली, तरी त्याचे या हंगामातील मानधन 18 कोटी रुपये (1.9 दशलक्ष डॉलर) इतकेच असेल. ‘आयपीएल’च्या कमाल मानधन नियमानुसार, मिनी लिलावात परदेशी खेळाडूचे कमाल मानधन हे सर्वाधिक रिटेन्शन स्लॅब (18 कोटी) आणि मागील मेगा लिलावातील सर्वाधिक किंमत (2025 मध्ये ऋषभ पंतसाठी 27 कोटी) यापैकी जी रक्कम कमी असेल, तितकेच असेल.
अष्टपैलू खेळाडू मुख्य आकर्षण केंद्र
वेगवान गोलंदाजी करणार्या अष्टपैलू खेळाडूंना नेहमीच मोठी किंमत मिळते. त्यामुळे प्रत्येकी 2 कोटी रुपयांची सर्वाधिक मूळ किंमत असलेले ग्रीन, वेंकटेश अय्यर आणि जेसॉन होल्डर आकर्षण केंद्र ठरतील. ‘आयपीएल’मधील आकडेवारी पाहता ग्रीनची कामगिरी 29 सामन्यांमध्ये 704 धावा आणि 16 बळी अशी सर्वसाधारणच असते; पण उपलब्ध खेळाडूंमध्ये ग्रीनच अधिक सरस असल्याने त्याच्यासाठी चुरस रंगू शकते.
संघाचे नवे पॉवर कोच असलेल्या आंद्रे रसेलला संघातून मुक्त केल्यामुळे ‘केकेआर’ला किमान दोन चांगले आघाडीचे फलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. वेगवान गोलंदाजी करणार्या अष्टपैलू खेळाडूंच्या या त्रिकुटातील तिसरा खेळाडू होल्डर कमी पर्याय असलेल्या छोट्या लिलावात तो उपयुक्त ठरू शकतो.