स्पोर्ट्स

IPL: कोलकाता सुसाट; पंजाब भुईसपाट

backup backup

मुंबई वृत्तसंस्था: आंद्रे रसेलने केलेल्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. पंजाब किंग्जवर त्यांनी 6 गडी राखून सहज मात केली. या कामगिरीमुळे आता दोन शानदार विजयांसह कोलकाताच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत कोलकाताने चेन्नईसारख्या तगड्या संघाला धूळ चारली होती हे उल्लेखनीय. विजयासाठी पंजाबने कोलकातापुढे 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. केकेआरने ते 14.3 षटकांतच सहज पार केले. त्यांनी 141 धावा केल्या. गुणतालिकेतही कोलकाताने अव्वल स्थान पटकावले आहे.

अवघ्या 31 चेंडूंचा सामना करताना रसेलने नाबाद 70 धावा कुटल्या. त्यात 8 उत्तुंग षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्याने हाणलेला प्रत्येक फटका कोलकाताला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. अजिंक्य रहाणेने 12, व्यंकटेश अय्यरने 3, कर्णधार श्रेयस अय्यरने 26 तर सॅम बिलिंग्जने 24 धावांचे योगदान दिले. नितीश राणा याला मात्र भोपळाही फोडता आला नाही. पंजाबकडून राहुल चहरने 2 तर कागिसो रबाडा आणि ओडीन स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यापूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने अक्षरशः हाराकिरी केली. 18.2 षटकांत त्यांचा सगळा संघ 137 धावा करून गारद झाला. त्यांना निर्धारित 20 षटकेही खेळता आली नाहीत. ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले व कोलकाताचे काम सोपे बनत गेले. पंजाबची सुरुवातच सनसनाटी झाली. फलकावर केवळ दोनधावा लागलेल्या असताना कर्णधार मयंक अग्रवाल याला उमेश यादवने पायचित पकडले. त्यानंतर भानुका राजपक्षेने अवघ्या नऊ चेंडूंत 31 धावा कुटल्या त्या तीन चौकार आणि तीन षटकारांसह. दुसरा सलामीवीर शिखर धवन हा फार काळ तग धरू शकला नाही. त्याने पंधरा चेंडूंत 16 धावा करताना एक चौकार व एक षटकार खेचला. लियाम लिव्हिंगस्टोन याने चमकदार 19 धावा केल्या. राज अंगद बावा पुन्हा एकदा अपयशी ठरला. सुनील नारायणने अकरा धावांवर त्याचा त्रिफळा उडवला. फलकावर तेव्हा 84 धावा लागल्या होत्या. अशा प्रकारे पंजाबचा निम्मा संघ गारद झाला.

सुरुवातीला दहाची धावगती राखलेल्या पंजाबला नंतर धावांसाठी मोताद व्हावे लागले. तशातच उमेश यादवने वैयक्तिक चौथा बळी मिळवून पंजाबला आठवा दणका दिला. राहुल चहरला त्याने नितीश राणाकरवी झेलबाद केले. अखेर कागिसो रबाडा (25) याने केलेल्या टोलेबाजीमुळे पंजाबला 137 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठणे शक्य झाले. कोलाताकडून उमेश यादवने 4, टिम साऊथीने 2 तर शिवम मावी, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT