स्पोर्ट्स

IPL History : आयपीएलमध्ये 18 वर्षांत 409 भारतीय खेळाडूंचे पदार्पण

IPL Records and History : 22 टक्के खेळाडू भारतीय संघात; प्रेक्षकसंख्या 400 टक्के, ब्रँड व्हॅल्यू 12 पटीने वाढली

रणजित गायकवाड

Indian cricketers IPL journey all time debut players

गेल्या 18 वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भारतीय युवा क्रिकेटपटूंसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. या स्पर्धेने शेकडो तरुण खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली आहे. एका आकडेवारीनुसार, 2008 ते 2025 या काळात सुमारे 409 भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये पदार्पण केले. यापैकी जवळपास 88 खेळाडू, म्हणजेच 22 टक्के खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले.

यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कोहली आयपीएल पदार्पणाच्या वर्षीच टीम इंडियामध्ये निवडला गेला, तर सूर्यकुमार यादवला 9 वर्षे लागली.

या हंगामात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांची इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. 2025 मध्ये 15 हून अधिक भारतीय खेळाडूंनी पदार्पण केले, ज्यात राजस्थानचा वैभव सूर्यवंशी, पंजाबचा प्रियांश आर्य, चेन्नईचा आयुष म्हात्रे आणि दिल्लीचा विप्रज निगम यांनी आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली.

प्रेक्षकसंख्येतही प्रचंड वाढ

आयपीएलच्या प्रेक्षकसंख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. 2008 मध्ये 20 कोटी लोकांनी आयपीएल पाहिले होते, तर 2025 मध्ये टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुमारे 100 कोटी लोकांनी याचा आनंद घेतला. 2019 मध्ये 33,800 कोटी मिनिटे पाहिली गेलेली ही स्पर्धा 2025 मध्ये 50 हजार कोटी मिनिटांपर्यंत पोहोचली.

ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीतही आयपीएलने मोठी झेप घेतली आहे. 2008 मध्ये 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,437 कोटी रुपये) असलेली ब्रँड व्हॅल्यू 2025 मध्ये 12 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.02 लाख कोटी रुपये) झाली आहे, जी 12 पटीने वाढ दर्शवते. ब्रँड व्हॅल्यूमध्ये चेन्नई पहिल्या, मुंबई दुसर्‍या आणि बेंगळुरू तिसर्‍या क्रमांकावर आहे.

....तरीही आयपीएलवर विदेशी खेळाडूंचा वरचष्मा!

भारतीय खेळाडूंना संधी मिळत असली तरी, आयपीएलवर परदेशी खेळाडूंचे वर्चस्वही दिसून येते. 18 हंगामांपैकी 13 वेळा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार परदेशी खेळाडूंनी जिंकला आहे. ख्रिस गेल, सुनील नरेन, एबी डिव्हिलियर्स, राशिद खान आणि लसिथ मलिंगा यांसारख्या खेळाडूंनी लीगला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली.

या हंगामातही परदेशी खेळाडूंनी 33 टक्के धावा केल्या आणि 36 टक्के बळी घेतले, त्यांची संख्या भारतीय खेळाडूंच्या तुलनेत एक तृतीयांश असूनही. लिलावातही परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागते. मेगा ऑक्शनमध्ये खर्च झालेल्या 639.15 कोटी रुपयांपैकी सुमारे 256 कोटी रुपये (40 टक्के) 62 परदेशी खेळाडूंना मिळाले, तर 120 भारतीयांना उर्वरित 60 टक्के रक्कम मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT