स्पोर्ट्स

IPL 2026 च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट; 2 टप्प्यांत होणार घोषणा! निवडणुकांच्या 'गुगली'वर BCCIचा मास्टरस्ट्रोक

IPL 2026 schedule update : RCBचे सलामीच्या लढतीसह पहिले पाच सामने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जातील.

रणजित गायकवाड

मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या 'आयपीएल'च्या १९ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. यंदाच्या आयपीएलवर निवडणुकांचे सावट असले तरी, बीसीसीआयने चाहत्यांची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे.

निवडणुकांचा 'गुगली', बीसीसीआयची 'स्ट्रॅटेजी'

देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. दरम्यान, मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलला सुरुवात होणार आहे. परिणामी निवडणुकांमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सावध पवित्रा घेतला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्पर्धेच्या वेळापत्रकाचे दोन भागात विभाजन करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होईल, तर निवडणुकांच्या तारखा समोर आल्यावर उर्वरित सामन्यांचे नियोजन लावले जाईल. पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल, तर दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांची घोषणा निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

२ मार्च रोजी पार पडलेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. याची अधिकृत घोषणा ६ किंवा ७ मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे. 'क्रिकबझ'च्या अहवालानुसार, सोमवारी झालेल्या बैठकीत दोन टप्प्यांत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यावर सहमती झाली असून, या आठवड्याच्या अखेरीस काही सामन्यांची यादी समोर येईल.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने ३ मार्च रोजी स्पष्ट केले की, हंगामातील सलामीच्या लढतीसह त्यांचे पहिले पाच सामने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जातील. त्यामुळे यंदाच्या हंगामाचा पहिला सामना बेंगळुरूमध्येच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सचिव संतोष मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बेंगळुरूमध्ये स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह एक प्ले-ऑफ सामनाही खेळवला जाणार आहे.

कर्णधारांच्या बैठकीचा तपशील पुढील आठवड्यात

बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना दिलेल्या माहितीनुसार, कर्णधारांच्या बैठकीबाबतचा सविस्तर तपशील पुढील आठवड्यात जाहीर केला जाईल. आयपीएल २०२६ चा पहिला टप्पा साधारण १३ ते १४ दिवसांचा असू शकतो. विदेशी खेळाडूंना मिळणारे 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) येत्या काही दिवसांत एकाच वेळी प्रसिद्ध केले जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयपीएल २०२६ चा थरार २८ किंवा २९ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT