मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात 'इंडियन प्रीमियर लीग'च्या (IPL 2026) १९ व्या हंगामाचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. यंदाच्या हंगामाचा थरार २८ मार्च पासून सुरू होणार असून, सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. हा सामना दुपारी ३:३० वाजता खेळवला जाईल.
१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २०२५ मध्ये जेतेपद पटकावलेला आरसीबीचा संघ यंदा 'डिफेंडिंग चॅम्पियन' म्हणून मैदानात उतरणार आहे.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी आपला पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. यानंतर, दुसऱ्या सामन्यातही आरसीबीचा संघ आपल्या घरच्या मैदानावर पारंपारिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध भिडणार आहे. सुरुवातीच्या दोन घरच्या सामन्यांनंतर आरसीबीचा संघ राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सशी त्यांच्या मैदानावर दोन हात करेल. गेल्या हंगामात ६५० हून अधिक धावा कुटणारा 'किंग' विराट कोहली याने आतापासूनच सराव सुरू केला असून त्याच्या ट्रेनिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) चा पहिला सामना २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार असून घरच्या मैदानावर विजयाने सुरुवात करण्याचा मुंबईचा मानस असेल.
२८ मार्च : आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू : दु. ३:३०
२९ मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर : वानखेडे स्टेडियम, मुंबई : सायं. ७:३०
३० मार्च : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी : सायं. ७:३०
३१ मार्च : पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स : मुल्लानपूर : सायं. ७:३०
१ एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स : इकाना स्टेडियम, लखनऊ : सायं. ७:३०
२ एप्रिल : केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : ईडन गार्डन्स, कोलकाता : सायं. ७:३०
३ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई : सायं. ७:३०
४ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली : दु. ३:३०
४ एप्रिल : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद : सायं. ७:३०
५ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स : राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद : दु. ३:३०
५ एप्रिल : आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू : सायं. ७:३०
६ एप्रिल : केकेआर विरुद्ध पंजाब किंग्स ईडन गार्डन्स, कोलकाता : सायं. ७:३०
७ एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी : सायं. ७:३०
८ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली : सायं. ७:३०
९ एप्रिल : केकेआर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स : ईडन गार्डन्स, कोलकाता : सायं. ७:३०
१० एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी : बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी : सायं. ७:३०
११ एप्रिल : पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : मुल्लानपूर : दु. ३:३०
११ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई : सायं. ७:३०
१२ एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स : इकाना स्टेडियम, लखनऊ : दु. ३:३०
१२ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी : वानखेडे स्टेडियम, मुंबई : सायं. ७:३०
चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की, दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी यंदाच्या हंगामातील सर्व सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र, संघात त्याची नेमकी भूमिका काय असेल, याचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
धोनी २०२६ च्या हंगामात पुन्हा एकदा पिवळी जर्सी परिधान करण्यासाठी सज्ज झाला आहे. वाढत्या वयामुळे तो सर्व सामने खेळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, विश्वनाथन यांनी या शंका फेटाळून लावल्या आहेत. "माझ्या मते, धोनी या हंगामातील सर्व सामने खेळेल," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सीएसके आपले सर्व घरचे सामने चेन्नईतच (चेपॉक मैदान) खेळणार असल्याचे विश्वनाथन यांनी स्पष्ट केले. "आम्ही तामिळनाडूमध्येच खेळणार आहोत, आता केवळ बीसीसीआयच्या अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे," असे ते म्हणाले.
दोन टप्प्यात वेळापत्रक : बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन सध्या पहिल्या २० दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित वेळापत्रक लवकरच घोषित केले जाईल.
पहिला 'डबल हेडर' : ४ एप्रिल रोजी हंगामातील पहिला 'डबल हेडर' (एकाच दिवशी दोन सामने) खेळवला जाईल. दुपारी दिल्ली विरुद्ध मुंबई आणि संध्याकाळी गुजरात विरुद्ध राजस्थान अशा चुरशीच्या लढती होतील.
यंदा ८४ सामने : या हंगामात एकूण ८४ सामने होणार असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाअंतिम सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.