स्पोर्ट्स

RCB in Trouble : आरसीबीला मोठा झटका! फॉर्मात असलेला सलामीवीर फलंदाज अचानक मायदेशी रवाना, गतविजेत्यांच्या अडचणीत वाढ

IPL 2026 : ही आरसीबीसाठी चिंतेची बाब ठरली असून, हंगामाच्या निर्णायक टप्प्यावर संघाला एका मॅचविनर खेळाडूची उणीव भासणार आहे.

रणजित गायकवाड

बेंगळुरू : आयपीएल २०२६ च्या हंगामात जेतेपद राखण्याचे ध्येय उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आक्रमक सलामीवीर फिल साल्ट दुखापतीमुळे स्पर्धेच्या मध्यंतरातच मायदेशी परतला आहे. साल्टची दुखापत ही आरसीबीसाठी चिंतेची बाब ठरली असून, हंगामाच्या निर्णायक टप्प्यावर संघाला एका मॅचविनर खेळाडूची उणीव भासणार आहे.

दुखापतीचे नेमके कारण काय?

'ईएसपीएन क्रिकइन्फो'ने दिलेल्या अहवालानुसार, फिल साल्टच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. १८ एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना 'डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग'वर झेल टिपण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला होता. या दुखापतीनंतर साल्ट गेल्या तीन सामन्यांपासून संघाबाहेर होता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) विनंतीवरून त्याला पुढील स्कॅनिंग आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी युनायटेड किंगडमला धाडण्यात आले आहे. आरसीबी व्यवस्थापनानेही यापूर्वी त्याच्या चाचण्या केल्या होत्या, मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

विराट-साल्ट जोडीने गाजवले मैदान

चालू हंगामात आरसीबीने आतापर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. या यशात विराट कोहली आणि फिल साल्ट या जोडीचा मोठा वाटा होता. साल्टने पहिल्या ६ सामन्यांत १६८.३३ च्या स्फोटक स्ट्राइक रेटने २०२ धावा कुटल्या होत्या. त्याच्या आक्रमक सुरुवातीमुळे विराट कोहलीला खेळपट्टीवर स्थिरावण्यास मदत होत होती. साल्टच्या अनुपस्थितीत आता आरसीबीच्या सलामीच्या जोडीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

बेथेलसाठी सुवर्णसंधी, पण आव्हाने मोठी

फिल साल्टच्या जागी इंग्लंडचाच युवा फलंदाज जेकब बेथेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. बेथेलने आयपीएलपूर्वी टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती, मात्र आयपीएलच्या मैदानात त्याला अद्याप सूर गवसलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या तीन डावांत त्याने केवळ ३९ धावा केल्या आहेत. साल्टच्या तोडीची फटकेबाजी करण्यात बेथेलला अपयश येत असल्याने आरसीबीची मधली फळी धास्तावलेली आहे.

प्ले-ऑफचे गणित आणि साल्टची प्रतीक्षा

आरसीबीचे आता पाच सामने शिल्लक असून त्यांचा मुकाबला लखनौ, मुंबई, कोलकाता, पंजाब आणि हैदराबाद यांसारख्या तगड्या संघांशी होणार आहे. बाद फेरी गाठण्यासाठी आरसीबीला हे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. फ्रँचायझीला आशा आहे की, साल्ट लवकरच फिट होऊन प्ले-ऑफपूर्वी संघात सामील होईल. साल्टची उणीव भरून काढणे बेथेलला जमेल की नाही, यावरच आता आरसीबीचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT