ipl 2026 rajasthan royals pick sri lanka dasun shanaka as replacement for injured sam curran
जयपूर : आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंनी अनेक संघांची डोकेदुखी वाढवली आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सलाही मोठा धक्का बसला होता. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला आहे. मात्र, राजस्थान रॉयल्सने तातडीने पावले उचलत त्याच्या जागी श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूची निवड करून आपली बाजू सावरली आहे.
राजस्थान रॉयल्सने आगामी आयपीएल २०२६ साठी सॅम करनचा पर्याय म्हणून श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू दसुन शनाका याला संघात स्थान दिले आहे. राजस्थान फ्रँचायझीने शनाकाला २ कोटी रुपयांच्या बोलीसह आपल्या ताफ्यात सामील केले आहे. संघाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दसुन शनाकाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. त्याने श्रीलंकेसाठी ६ कसोटी, ७१ एकदिवसीय (ODI) आणि १३१ टी-२० सामने खेळले आहेत. या प्रवासात त्याने ३३५० पेक्षा अधिक धावा आणि ८६ बळी आपल्या नावे केले आहेत. आयपीएलचा विचार करता, शनाकाने यापूर्वी गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्याला भारतीय खेळपट्ट्यांचा आणि लीगच्या वातावरणाचा चांगला अनुभव आहे. सॅम करनची उणीव भरून काढण्यासाठी राजस्थानने एका अनुभवी आणि संतुलित खेळाडूला पसंती दिली आहे.
आयपीएल २०२६ चा बिगुल २८ मार्चपासून वाजणार असला, तरी राजस्थान रॉयल्स आपल्या मोहिमेची सुरुवात ३० मार्च रोजी (सोमवार) करणार आहे. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात राजस्थानसमोर ५ वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचे कडवे आव्हान असेल. २००८ मध्ये पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावल्यानंतर राजस्थानला अद्याप दुसऱ्यांदा चषक उंचावता आलेला नाही. युवा रियान परागच्या नेतृत्वाखाली यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे राजस्थानचे लक्ष्य असेल.
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, लुआन-ड्रे-प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, संदीप शर्मा, युद्धवीर चरक, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, यशराज पुंजा, विघ्नेश पुथूर, रवी सिंह, अमन राव, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिल्ने, कुलदीप सेन आणि दशुन शनाका.