स्पोर्ट्स

IPL 2026 : "...तर कॅमेरून ग्रीनच्‍या 25.20 कोटींच्या पगारातून कपात करा" : अश्विनने शाहरुख खानला नेमका कोणता सल्‍ला दिला?

ग्रीन IPL 2026 मिनी लिलावात ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू

पुढारी वृत्तसेवा

Ashwin on Cameron Green salary

नवी दिल्‍ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याच्यावर असतील. मिनी लिलावात तब्बल २५.२० कोटी रुपयांना खरेदी केलेला ग्रीन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. मात्र, तो सध्या खराब फॉर्मशी झगडत असून त्याच्या गोलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ग्रीनबाबत एक मोठे विधान केले आहे.

ऑस्‍ट्रेलिया ग्रीनला प्रत्‍येक सामन्‍यात ४ षटके टाकण्‍याची परवानगी देणार का?

आपल्या 'Ash ki Baat' या हिंदी युट्युब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, "माझा कॅमेरून ग्रीनबाबत एक प्रश्न आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात ४ षटके गोलंदाजी करण्याची परवानगी देणार का?"

शाहरुख खान आणि केकेआर नाराज होतील: अश्विन

"जर तुम्ही केकेआर आणि शाहरुख खान असाल, तुम्ही एका खेळाडूला २५ कोटी रुपये दिले आहेत आणि तो म्हणतोय की 'मी फक्त एकच ओव्हर टाकेन,' तर तुम्हाला कसं वाटेल?", असा सवाल करत फिटनेसच्या कारणास्तव ग्रीनने आपल्या कोट्यातील पूर्ण षटके टाकली नाहीत, तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सह-मालक शाहरुख खान नाराज होणे स्वाभाविक आहे. जर एखादा खेळाडू पूर्ण ४ षटके टाकू शकत नसेल, तर फ्रँचायझींना त्याच्या करारातील रक्कम कापून घेण्याचा अधिकार असावा. फ्रँचायझींनी एखाद्या खेळाडूवर मोठी गुंतवणूक केली असेल आणि तो खेळाडू आपली भूमिका पूर्ण करू शकत नसेल, तर त्यांचे पैसे कापले जावेत, असे मतही त्‍याने व्‍यक्‍त केले.

त्याच्या करारातून २ कोटी रुपये कापण्याचा अधिकार संघाला असावा

"हे खूप सोपे आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणते की 'तुम्ही आयपीएल खेळा, पण आमच्यासाठी कसोटी क्रिकेट महत्त्वाचे आहे' कारण तो त्यांच्या केंद्रीय करारात आहे. पण तशीच संधी आयपीएल संघांनाही मिळायला हवी. जर त्याने फक्त दोनच षटके टाकली, तर त्याच्या करारातून २ कोटी रुपये कापण्याचा अधिकार संघाला असावा, अशी अपेक्षाही अश्‍विनने व्‍यक्‍त केली.

४ षटके टाकणे बंधनकारक असावे

अश्विनने स्पष्ट केले की, "जर ग्रीन ४ षटके टाकू शकत नसेल, तर तुम्हाला पैसे कापण्याचा अधिकार आहे. जेव्हा तो लिलावात आला, तेव्हा त्याने प्रत्येक सामन्यात ४ षटके टाकावीत अशीच अपेक्षा होती. त्यावर काही निर्बंध असतील, तर संघाने करारातील रक्कम कमी करावी. हे माझे साधे आणि नम्र मत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT