IPL 2026 RCB Pune pudhari photo
स्पोर्ट्स

IPL 2026 RCB Pune: आगामी IPL हंगामात पुणे असणार RCB चं होम ग्राऊंड...? मोठं कारण आलं समोर

गतविजेते रॉयल चॅलेंजर बंगळुरू हा संघ आगामी हंगामाची सुरूवात ही दुसऱ्या होम ग्राऊंडवरून करण्याची शक्यता आहे.

Anirudha Sankpal

IPL 2026 RCB New Home Ground:

आयपीएल २०२६ च्या हंगामात आरसीबीला आपलं होम ग्राऊंड बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम सोडावं लागणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमला KSCA Maharaja T20 Trophy आणि आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ च्या सामन्यांना देखील मुकावं लागलं होतं.

गतविजेते रॉयल चॅलेंजर बंगळुरू हा संघ आगामी हंगामाची सुरूवात ही दुसऱ्या होम ग्राऊंडवरून करण्याची शक्यता आहे. त्यांना आपले सर्व होम सामने हे पुण्यात खेळावे लागण्याची शक्यता आहे. याचं मोठं कारण समोर आलं आहे. आरसीबीने पहिली वहिली आयपीएल चॅम्पियनशिप पटकावल्यानंतर ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर व्हिक्टरी परेड ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी घालण्यात आली होती.

पुण्याच्या MCA स्टेडियमनं दिली ऑफर

पुण्याच्या गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आरसीबीचे होम सामने होस्ट करण्याची तयारी दर्शवली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ यांनी याबाबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. 'आरसीबीचे सामने पुण्यात आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे मात्र अजून निश्चित असा काही निर्णय झालेला नाही. चेंगराचेंगरी झाल्यानंतर आरसीबीला कर्नाटकमध्ये सामने खेळवण्यात समस्या आहे. त्यामुळं ते व्हेन्यूचा शोध घेत आहेत आम्ही त्यांना आमच्या स्टेडियमची ऑफर दिली आहे.'

पिसाळ यांनी शेवटची परवानगी मिळवण्यासाठी काही तांत्रिक बाबी सोडवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. जर हे सर्व निश्चित झालं तर २००८ नंतर पहिल्यांदाच आरसीबी आयपीएलचा हंगाम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार नाही. आरसीबीनं त्यांचा यापूर्वीचे सर्वच्या सर्व १७ हंगाम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमबाबत स्पष्टता नाही

चिन्नास्वामी स्टेडियमबाबत साशंकता ही गेल्या काही महिन्यांपासून आहे. ४ जून रोजी चेंगराचेंगरीची घटना झाली त्यात ११ लोकांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यानंतर कर्नाटक सरकारनं चिन्नास्वामी स्टेडियमवरील सर्व महत्वाच्या स्पर्धा निलंबित केल्या आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला या प्रकरणात मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि खजिनदारांना राजीनामा द्यावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT