स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi: 6,6,6,6,6,6.. वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी; गेलचा महाविक्रम मोडीत काढत ठरला IPL चा नवा ‘सिक्सर किंग’

वैभव २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करून बाद झाला. या शानदार खेळीत त्याने ५ चौकार आणि तब्बल १२ षटकार लगावले.

रणजित गायकवाड

चंदीगड: अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या १९ व्या हंगामात क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अटीतटीच्या एलिमिनेटर सामन्यात आक्रमक फलंदाजी करत वैभवने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा एका मोसमातील सर्वाधिक षटकारांचा ऑल-टाइम विक्रम मोडीत काढला आहे. या कामगिरीसह वैभव आता आयपीएलच्या इतिहासातील नवा ‘सिक्सर किंग’ ठरला आहे.

न्यू चंदीगडमधील मुल्लांपुर स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. आपल्या डावातील सातवा षटकार मारताच त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाला मागे टाकले. या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने केवळ १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. शतकाकडे वाटचाल करत असताना वैभव २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करून बाद झाला. या शानदार खेळीत त्याने ५ चौकार आणि तब्बल १२ षटकार लगावले.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज:

  • वैभव सूर्यवंशी (२०२६): ६५ षटकार

  • ख्रिस गेल (२०१२): ५९ षटकार

  • आंद्रे रसेल (२०१९): ५२ षटकार

  • ख्रिस गेल (२०१३): ५१ षटकार

  • जोस बटलर (२०२२): ४५ षटकार

केवळ षटकारांचा विक्रमच नव्हे, तर वैभवने ऋषभ पंत आणि यशस्वी जयसवाल यांच्याही विक्रमांना गवसणी घातली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करताच वैभवने यंदाच्या हंगामात ६०० धावांचा टप्पा ओलांडला. यासह, आयपीएलच्या एकाच हंगामात ६०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो आतापर्यंतचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंतच्या नावावर (२०१८) होता.

याव्यतिरिक्त, आयपीएलमध्ये एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा ‘अनकॅप्ड’ (भारतीय संघाकडून न खेळलेला) खेळाडू म्हणूनही वैभवने इतिहास रचला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एकूण ६३० धावांचा पल्ला गाठत यशस्वी जयसवालचा २०२३ मधील ६२५ धावांचा विक्रम मागे टाकला. तसेच, आयपीएलमधील डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने ब्रेंडन मॅक्युलमच्या विक्रमाशी बरोबरी केली असून, या हंगामात त्याने पहिल्या षटकात एकूण १० षटकार ठोकले आहेत. अवघ्या १५ व्या वर्षी वैभवने गाजवलेली ही कामगिरी क्रिकेट जगतासाठी एक विस्मयकारक घटना मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT