IPL 2026 Schedule  pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026 Schedule Announced : आयपीएल 2026 चे बिगुल वाजले! 28 मार्चपासून थरार सुरू

आसाम, तामिळनाडू आणि प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांमुळे स्पर्धेच्या वेळापत्रकास विलंब

रणजित गायकवाड

मुंबई : आयपीएलच्या 19 व्या हंगामाची प्रतीक्षा संपली आहे. या वर्षाचा आयपीएल2026चा हंगाम 28 मार्चपासून सुरू होणार असून, अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाईल. बीसीसीआयने सुरुवातीला 26 मार्च ही तारीख निश्चित केली होती, मात्र अंतर्गत निर्णयानुसार यात दोन दिवसांचा बदल करण्यात आला आहे.

आयपीएल 2026 चे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका.

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चे घरचे मैदान कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे आहे. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) चे होम ग्राऊंड चेन्नई (तामिळनाडू) मध्ये आहे. राजस्थान रॉयल्स (आरआर) त्यांचे काही सामने गुवाहाटी (आसाम) येथे खेळते. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर न केल्यामुळे बीसीसीआयला सुरक्षा व्यवस्थेचा विचार करून वेळापत्रक ठरवण्यात अडचण येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरसीबीचे घरचे सामने कुठे होणार?

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) कडे या हंगामाचे उद्घाटन करण्याचा बहुमान आहे. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये जेतेपदाच्या जल्लोषादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आरसीबीचे 7 घरचे सामने कुठे खेळवायचे, याबाबत अद्याप पेच कायम आहे. आरसीबीने नवी मुंबई, रायपूर आणि पुणे या शहरांची पर्यायी ठिकाणे म्हणून निवड केली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनसोबतच्या चर्चेनंतरच चिन्नास्वामी स्टेडियमबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

दोन टप्प्यात वेळापत्रक

निवडणुकीच्या काळामुळे 2009, 2014, 2019 आणि 2024 प्रमाणेच याही वेळी आयपीएलचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले जाऊ शकते. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात उद्घाटन सामना आणि संपूर्ण वेळापत्रकाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT