IPL 2025 suspended Updates BCCI may arrange remaining matches in August and September
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढलण्यात आला आहे. दरम्यान, या हंगामाचे उर्वरीत सामने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील, असे सुत्रांनी सांगितले आहे.
यंदा आयपीएलची सुरुवात 2 मार्च रोजी सुरू झाले. 7 मे पर्यंत 57 वा सामने खेळवण्यात आले आहेत. स्पर्धेतील 58वा सामना 8 मे रोजीचा पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यात धर्मशाळा येथे सुरू झाला. पण पाकिस्तानने केलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यामुळे 10 षटकांच्या खेळानंतर हा सामना अचानक रद्द करण्यात आला.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 9) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाला (IPL 2025) तात्पुरती स्थगिती दिली. आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणे याबाबत अधिक माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले.
आयपीएल 2025 मध्ये 10 संघांमध्ये 74 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 25 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे. सध्या 58 सामने खेळले गेले आहेत आणि 16 सामने अजून बाकी आहेत.
आयपीएल 2025 चे उर्वरित सामने कधी खेळवले जाणार हा प्रश्न सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. नवीन तारखा आणि सामन्यांच्या ठिकाणांची पुन्हा तयारी केल्यानंतर वेळापत्रक तयार केले जाईल. सुत्रांच्या माहितीनुसार आता स्पर्धेतील उर्वरित सामने ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये खेळवले जाऊ शकता.
या महत्त्वाच्या टप्प्यावर, बीसीसीआय देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि आपल्या देशातील लोकांसोबत आमची एकता व्यक्त करतो. आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला बोर्ड सलाम करतो, ज्यांचे वीर प्रयत्न ऑपरेशन सिंदूर अंतर्गत राष्ट्राचे रक्षण आणि प्रेरणा देत आहेत, कारण ते अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याला आणि पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या अनपेक्षित आक्रमणाला दृढ प्रतिसाद देत आहेत, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.
याआधीही, 2021 मध्ये कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान (4 मे 2021 रोजी) तत्कालीन हंगामातील सामने अर्धवट थांबवण्यात आले होते. नंतर उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात आले.