स्पोर्ट्स

IPL Ticket Scam : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगनमोहन राव यांना अटक

SRH ने दिला होता राज्य बदलण्याचा इशारा

रणजित गायकवाड

आयपीएल 2025 मधील तिकीट घोटाळा प्रकरणी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष ए. जगनमोहन राव यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 9) तेलंगणा गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) त्यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये HCA चे खजिनदार सी. श्रीनिवास राव, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुनील कांते, सरचिटणीस राजेंद्र यादव आणि अध्यक्ष राव यांच्या पत्नी जी. कविता यांचा समावेश आहे. या सर्वांवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला तिकिटांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. बीसीसीआयच्या (BCCI) नियमांनुसार, कोणत्याही संघाच्या यजमान स्टेडियमला एकूण आसनक्षमतेच्या 10% पासेस मोफत दिले जातात.

प्रकरणाची सुरुवात कधी झाली?

तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे (TCA) सरचिटणीस धर्म गुरव रेड्डी यांनी 9 जून रोजी एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये HCA वर बनावटगिरी, गैरव्यवहार आणि दबाव आणण्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. या तक्रारीच्या आधारे, CID ने विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम 465 (बनावटगिरी), 468 (फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरी), 471 (बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे), 403 (संपत्तीचा अप्रामाणिक वापर), 409 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) यांचा समावेश आहे. राव यांनी निवडणुकीत भाग घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप आहे.

SRH वर तिकिटांसाठी दबाव

HCA वर आरोप आहे की, त्यांनी आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) निश्चित मर्यादेपेक्षा अधिक मोफत पासेसची मागणी केली. SRH, HCA आणि BCCI यांच्यात झालेल्या करारानुसार, HCA ला केवळ 3,900 मोफत तिकिटे (स्टेडियमच्या क्षमतेच्या 10%) मिळायला हवीत. मात्र, HCA अधिकाऱ्यांनी अतिरिक्त 10% तिकिटांची मागणी केली, ज्याला SRH ने नकार दिला.

कॉर्पोरेट बॉक्स बंद करून तिकिटांची मागणी

SRH ने असाही आरोप केला आहे की, 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी काही तास आधी HCA अध्यक्षांनी एक कॉर्पोरेट बॉक्सला कुलूप लावून 20 अतिरिक्त तिकिटांची मागणी केली. हे कराराचे उल्लंघन होते.

SRH ने दिला होता राज्य बदलण्याचा इशारा

परिस्थिती इतकी चिघळली की, SRH ने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयकडे तक्रार केली. तसेच, हे दबावतंत्र थांबले नाही, तर आपले यजमान सामने दुसऱ्या राज्यात आयोजित करण्याचा इशाराही दिला.

आताही 3,900 तिकिटेच मिळणार

हा तणाव कमी करण्यासाठी, HCA चे सचिव आर. देवराज यांनी SRH संघ व्यवस्थापकासोबत बैठक घेतली. यामध्ये, पूर्वीप्रमाणेच HCA ला 3,900 मोफत पासेसच मिळतील, असे निश्चित झाले. यानंतर SRH आणि HCA ने एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, प्रेक्षकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी ते आता व्यावसायिक पद्धतीने एकत्रितपणे काम करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT