पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पंड्या खेळणार नाही. 2024 च्या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे त्यांच्यावर एका सामन्याचा बंदी घालण्यात आला होती, जी यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी लागू असेल. अशा परिस्थितीत, सूर्यकुमार यादव एमआयचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
सूर्या हा भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे. परिणामी संघाच्या कामगिरीवर त्याचा काय परिणाम होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सूर्याकडे कर्णधारपद सोपवण्याबाबतची ही माहिती स्वतः पंड्याने दिली आहे. 19 मार्च रोजी त्याने मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंड्या म्हणाला, ‘सूर्या सध्या भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत, माझ्या अनुपस्थितीत, तो एमआयचे नेतृत्व करण्यासाठी योग्य उमेदवार आहे. मी नशीबवान आहे की माझ्या संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांसारखे तीन उत्कृष्ट कर्णधार आहेत. हे तिघेही नेहमी माझ्या पाठीशी राहतात.’
पंड्या पुढे म्हणाला की, ‘मुंबई इंडियन्सचा इतिहास वाखाणण्याजोगा आहे. या संघाच्या चाहत्यांच्या अपेक्षा नेहमीच खूप उंच असतात. त्यामुळे त्या अपेक्षांवर खरे उतरणे हे नेहमीच एक मोठे आव्हान असते. पण मी कर्णधार म्हणून या आव्हानाचा आनंद घेतला आहे. सध्या माझे पूर्ण लक्ष सर्वोत्तम कामगिरी करण्यावर आहे.’
मुंबई इंडियन्सच्या मागील हंगामाचा विचार करता, संघाचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब राहिले. त्यांनी 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले. हा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात चाहत्यांना संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आपल्या खराब फॉर्मवर मात करून पुन्हा विजयी अभियान सुरू करेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
कर्णधार : हार्दिक पंड्या
मुख्य खेळाडू : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह
अन्य खेळाडू :
बेवॉन जैकब्स, रयान रिकेल्टन, रॉबिन मिंज, कृष्णन श्रीजीत, नमन धीर, राज अंगद बावा, विग्नेश पुथुर, वेंकट सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बॉश, विल जैक, मिचेल सेंटनर, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, रीस टॉपली, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर
IPLचा उद्घाटन सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. टूर्नामेंटचा अंतिम सामनाही ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये 25 मे रोजी होणार आहे. प्लेऑफ सामने 20 मे पासून सुरू होतील, ज्यामध्ये क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवले जातील.
या हंगामात 12 डबल हेडर (दिवसभरात दोन सामने) असतील, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक क्रिकेटचा आनंद लुटता येईल. संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक आणि वेळा जाणून घेण्यासाठी, अधिकृत IPL वेबसाइटला भेट देऊ शकता. या हंगामात अनेक रोमांचक सामन्यांची अपेक्षा आहे, ज्यामध्ये सर्व संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.