पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहम्मद शमी (Mohammed Shami) 12 एप्रिल ही तारीख कधीच विसरू शकणार नाही. कारण पंजाब किंग्स (PBKS)च्या फलंदाजांनी त्याची इतकी धु धु धुलाई केली की आता त्याची झोप उडाली आहे. हैदराबादमधील मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्गसमान तर गोलंदाजांसाठी नरकासारखी आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH)ने राजस्थान रॉयल्स (RR)च्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer)चीही धुलाई याच मैदानावर केली होती. तसाच प्रकार आता एसआरएचचा मुख्य गोलंदाज शमीच्या बाबतीतही घडला. प्रथम फलंदाजी करताना PBKS ने SRH विरोधात 245 धावा केल्या, ज्यातील 75 धावा शमीच्या 4 षटकांच्या स्पेलमधून आल्या.
दुखापतीतून सावरल्यानंतर शमीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले आहे. त्याला यंदाच्या IPL हंगामात आतापर्यंत 6 सामन्यात केवळ 5 विकेट्स घेता आल्या आहेत. पहिल्या 5 सामन्यांमध्ये त्याने 20 षटकांत 158 धावा दिल्या होत्या. पण PBKS विरुद्ध तो पूर्णपणे हतबल दिसला. विकेट मिळवणे दूर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पंजाबच्या फलंदाजांनी त्याची केवळ धुलाई केली. PBKS चे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन यांनी सुरुवातीच्या षटकांमध्येच त्याला लक्ष्य केले. त्यानंतर स्टोइनिसने त्याला शेवटपर्यंत सोडले नाही. अंतिम षटकातील शेवटच्या 4 चेंडूंवर त्याने 4 षटकार मारले.
भारतीय गोलंदाजांमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम शमीच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी अशी कामगिरी मोहित शर्माच्या नावावर होती. त्याने 2024 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकांत 73 धावा दिल्या होत्या. यानंतर बासिल थम्पीचा नंबर लागतो, ज्याने 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध 4 षटकांत 70 धावा दिल्या. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणाऱ्यांमध्ये यश दयालचेही नाव आहे. त्याने 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना 4 षटकांत 69 धावा दिल्या होत्या. याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने यश दयालच्या 5 चेंडूंवर 5 षटकार मारून थरारक विजय साकारला होता.