पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (दि.१६) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या स्पर्धेचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होईल. अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
२३ मार्च रोजी आयपीएलचा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना खेळला जाईल. आयपीएलच्या १८व्या हंगामात ६५ दिवसांत १३ ठिकाणी एकूण ७४ सामने खेळवले जातील. यामध्ये नॉकआउट फेऱ्यांचाही समावेश आहे. या काळात २२ मार्च ते १८ मे या कालावधीत ७० लीग फेरीचे सामने खेळवले जातील. त्याचवेळी, अंतिम सामन्यासह सर्व प्लेऑफ सामने २० ते २५ मे दरम्यान खेळवले जातील.
आयपीएल स्पर्धेत स्पर्धेचे उद्घाटन आणि अंतिम सामने गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातात. यावेळीही हे दोन्ही सामने कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत. अंतिम सामना २५ मे रोजी होईल, क्वालिफायर-२ देखील २३ मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल.गेल्या हंगामातील उपविजेत्या संघ सनरायझर्स हैदराबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी स्टेडियमवर दोन प्लेऑफ सामने देखील होतील. येथे क्वालिफायर-१ २० मे रोजी आणि एलिमिनेटर २१ मे रोजी खेळवला जाईल.
५, ६, १२, १३, १९, २० आणि २७ एप्रिल रोजी दररोज दोन सामने होतील. ४, ११ आणि १८ मे रोजी डबल हेडर खेळवले जातील. सर्व डबल हेडर फक्त शनिवारी किंवा रविवारी होतील.
अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, लखनौ, मुल्लानपूर (मोहाली), दिल्ली, जयपूर, कोलकाता, हैदराबाद ही १० संघांची होम ग्राउंड आहेत. याशिवाय, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाळा यासह एकूण १३ ठिकाणी सामने खेळवले जातील.
आयपीएल ही भारतातील एक फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा आहे. २००८ मध्ये ८ संघांसह त्याची सुरुवात झाली. अंतिम सामन्यात चेन्नईचा पराभव करून राजस्थानने पहिल्या हंगामाचे विजेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ५ जेतेपदे जिंकली आहेत. केकेआर हा ३ जेतेपदे जिंकणारा तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. यानंतर १२ दिवसांनी आयपीएल सुरू होईल. याचा अर्थ खेळाडूंना योग्य तयारीसाठी २ आठवडेही मिळणार नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ मार्चपासून सुरू होईल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई येथे होणार आहे. भारताचा पहिला सामना २० मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. टीम इंडिया दुबईला रवाना झाली आहे.