IPL 2025 RR vs PBKS x
स्पोर्ट्स

IPL 2025 RR vs PBKS: पंजाबची विजयी गर्जना! राजस्थानवर 10 धावांनी मात

IPL 2025 RR vs PBKS: धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरवातीनंतरही राजस्थानचा पराभव

पुढारी वृत्तसेवा

IPL 2025 RR vs PBKS:

जयपूर ः आयपीएल 2025 मध्ये राजस्थानातील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. पंजाबच्या 219 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ निर्धारीत 20 षटकात 209 धावाच करू शकला.

आक्रमक सुरवातीनंतरही राजस्थानचा अ‍वघ्या 10 धावांनी पराभव झाला. पंजाबच्या विजयात नेहल आणि हरप्रीत यांनी महत्वाचा वाटा उचलला.

या विजयामुळे पंजाबचे आता 12 सामन्यांत मिळून एकूण 17 गुण झाले असून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघाचेही 12 सामन्यात 17 गुण झाले आहेत. राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान यापुर्वीच संपुष्टात आले आहे. गुणतक्त्यात बेंगळूरू पहिल्या तर पंजाब दुसऱ्या स्थानावर आहे.

राजस्थानची इनिंग

पंजाब किंग्जने दिलेले 219 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने आक्रमक सुरवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी 5 व्या षटकांपर्यंत 76 धावा फटकावल्या. वैभवने 4 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने अवघ्या 15 चेंडूत 40 धावा फटकावल्या. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर झेवियर बार्टलेट याने त्याचा झेल घेतला.

त्यानंतर आठव्या षटकात संघाचे शतक फलकावर लागलेले असताना यशस्वी जयस्वाल 25 चेंडूत 50 धावा काढून बाद झाला. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन 16 चेंडूत 20, रियान पराग याने 11 चेंडूत 13 धावा कडून स्वस्तात परतले.

त्यानंतर ध्रुव जुरेलने 31 चेंडूत 4 षटकार, 3 चौकारांच्या सहाय्याने 51 धावांची खेळी केली. पण तोपर्यंत सामना पंजाबच्या बाजूने झुकला होता.

पंजाबकडून हरप्रीत ब्रार याने 3 विकेट घेतल्या. तर अजमततुल्लाह ओमरझाई आणि मार्को यानसेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

पंजाबची इनिंग

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांत पंजाबने 5 बाद 219 धावा केल्या.

दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या डावापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरला बाहेर बसवले. श्रेयस थोडा अस्वस्थ असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या जागी हरप्रीत ब्रार मैदानात उतरला, तर उर्वरित सामन्यासाठी शशांक सिंगने पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.

श्रेयसने प्रथम डावात फलंदाजी केली होती, पण नेहमीच्या क्रमांक 3 ऐवजी तो क्रमांक 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आपल्या जागी पदार्पण करणाऱ्या मिचेल ओवेनला संधी दिली, मात्र ओवेन केवळ दोन चेंडूत बाद झाला. पंजाबने झपाट्याने सुरुवात केली होती, पण लवकरच प्रियांश आर्य बाद झाला. त्यानंतर ओवेन आणि प्रभसिमरनही झटपट माघारी परतले आणि केवळ 3.1 षटकांत 34 धावांवर पंजाबचे 3 फलंदाज माघारी गेले.

अशा कठीण परिस्थितीत श्रेयसने निहाल वढेरा बरोबर भागीदारी केली. निहालने आक्रमक फलंदाजी करताना श्रेयससोबत 67 धावांची भागीदारी केली. श्रेयसने 25 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या आणि त्यात 5 चौकारांचा समावेश होता. त्याला रियान परागने बाद केले.

निहाल-शशांक यांची फटकेबाजी

श्रेयस बाद झाल्यानंतर निहाल आणि शशांक यांनी डाव सांभाळला. निहालने 37 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या, ज्यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याने सामन्याचा वेग वाढवून दिला.

शशांक सिंगनेही तडाखेबाज फलंदाजी करत 30 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या आणि त्याच्या फलंदाजीत सर्वत्र अप्रतिम फटके दिसून आले. अझमतुल्ला ओमरजईने शेवटी फक्त 9 चेंडूंमध्ये 21 धावा करत पंजाबला 219 धावांपर्यंत नेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT