स्पोर्ट्स

IPL 2025 Playoffs Scenario : गतविजेत्या KKRचे आव्हान संपुष्टात, RCB अजून तळ्यात-मळ्यात, जाणून घ्या 6 संघांचे ‘प्लेऑफ’ समीकरण

KKR विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, RCB संघ 17 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पण त्यांना अधिकृतपणे प्लेऑफ पात्रता मिळालेली नाही.

रणजित गायकवाड

बंगळूर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित झालेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2025 स्पर्धा शनिवारी पुन्हा सुरू झाली; परंतु चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. 9 दिवसांनी सुरू झालेल्या स्पर्धेवर पावसाचे पाणी पडले. यामुळे बंगळुरात होणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.

दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. परिणामी, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान संपुष्टात आले. त्यांचे 13 सामन्यांत 12 गुण झाले असून पुढील सामना जिंकला तरी ते प्ले ऑफमध्ये जाऊ शकत नाहीत.

बंगळूरच्या मैदानातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या खात्यात 12 सामन्यांनंतर 8 विजय आणि एका अनिर्णीत सामन्यासह मिळालेल्या एका गुणासह 17 गुण मिळाले आहेत. प्ले ऑफचा त्यांचा मार्ग सोपा झाला असला तरी गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचूनही या संघासह एकही संघ अद्याप प्ले ऑफसाठी अधिकृतरीत्या पात्र ठरलेला नाही.

आज 2 महत्त्वाचे सामने

आज, रविवारी (दि. 18) आयपीएलमध्ये डबल हेडर आहे. पहिला सामना राजस्थान विरुद्ध पंजाब आणि दुसरा सामना दिल्ली विरुद्ध गुजरात असा होईल. जर पंजाब किंग्ज जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील. यानंतर, त्यांचे 2 सामने शिल्लक असतील, त्यापैकी त्यांना 1 जिंकावा लागेल. तर जर गुजरात टायटन्सने दुसरा सामना जिंकला तर तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनेल. जर दिल्ली संघ हरला तर त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. तर पुढील दोन सामने जिंकल्यानंतरही त्यांना फक्त 17 गुण मिळतील.

मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट सर्वोत्तम

मुंबई इंडियन्सचे लीग टप्प्यातील 2 सामने शिल्लक आहेत. त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना म्हणजे करो या मरो असा काहीसा असणार आहे.

एलएसजीला जिंकावे लागतील सर्व सामने

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यांचे अजूनही 3 सामने शिल्लक आहेत आणि सर्व जिंकल्यानंतर ते 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. जर संघाने सध्याच्या परिस्थितीत एकही सामना गमावला तर ते अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. संघाचा पुढील सामना सोमवारी (दि. 19) हैदराबादशी आहे.

प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारे संघ

  • चेन्नई सुपर किंग्ज

  • राजस्थान रॉयल्स

  • सनरायझर्स हैदराबाद

  • कोलकाता नाईट रायडर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT