पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्सविरुद्धचा सामना 7 गडी राखून जिंकत या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. या सामन्यात आरसीबीसाठी विराट कोहलीने शानदार अर्धशतकी खेळी करत एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला. कोहली आयपीएलच्या 252 डावांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 67 वेळा 50+ स्कोअर केले आहेत.
पंजाब किंग्सविरुद्धच्या मागील सामन्यात विराट कोहली फक्त 1 धाव काढून बाद झाला होता. पण रविवारच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात फलंदाजी केली आणि चाहत्यांची मने जिंकली. कोहलीने या सामन्यात नाबाद 73 धावांची अकर्षक खेळी करून आरसीबीला विजय मिळवून दिला.
कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला. त्याने आयपीएलमध्ये 66 वेळा 50+ धावा केल्या आहेत. आता कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये 8 शतके आणि 59 अर्धशतके नोंदवलेली आहेत. अशाप्रकारे त्याच्या नावावर 67 वेळा 50+ धावांच्या खेळीची नोंद झाली आहे. कोहलीची आयपीएलमधील फलंदाजीचा सरासरी सुमारे 40 च्या आसपास आहे.
एकूण टी-20 क्रिकेटमधील विराट कोहलीचे ही 110 वी 50+ धावांची खेळी आहे. यासह त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावांची खेळी करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने अशी कामगिरी 116 वेळा केली आहे.