पुढारी ऑनलाईन डेस्क : Ricky Ponting Puja : इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिले जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंजाब किंग्ज संघाने सरावसोबतच देवाचा धावा केला आहे. संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी मंदिरात जाऊन भक्तीभावाने आणि हिंदू पद्धतीने पूजा केली. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिकी पाँटिंग स्वतः हवनात आहुती देताना दिसले. त्यांनी फक्त हवनच नाही, तर संघाच्या विजयासाठी विधीवत पूजा-अर्चना देखील केली. या हवन कार्यक्रमात संपूर्ण संघ, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफही सामील झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आणि चाहतेही त्याला पसंती देत आहेत.
व्हिडिओमध्ये पॉन्टिंग भारतीय परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहेत. ही क्लिप व्हायरल होताच पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना मिर्ची झोंबली आहे. त्यांनी पॉन्टिंग यांच्यावर टीका केली. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी म्हटले की पैशासाठी पॉन्टिंगला हे सर्व करायला लावले जात आहे. या ट्रोलिंगला भारतीयांची सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. हे संघाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे, असे चाहत्यांनी म्हटले आहे.
यावेळी श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचे नेतृत्व सांभाळेल. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी 10 संघांच्या कर्णधारांचे फोटोशूट करण्यात आले आहे. नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडूंसह, पंजाब किंग्ज आयपीएल ट्रॉफी जिंकण्यास सज्ज झाले आहेत. हंगामातील त्यांचा पहिला सामना 25 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.