स्पोर्ट्स

पंड्या अडचणीत! IPL 2025मध्ये ‘चुकीची पुनरावृत्ती’, BCCIने ठोठावला लाखोंचा दंड

Hardik Pandya Punishment : शेवटचे षटक उशिरा सुरू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Punishment : आयपीएल 2025 मधील 9वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव पत्करावा लागला. हा त्यांचा सलग दुसरा पराभव आहे. शनिवारी (दि. 30) गुजरातविरुद्धच्या सामन्यात एमआय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्यावर होती. स्पर्धेचा पहिला सामना तो बंदीच्या कारवाईमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे यंदाच्या हंगामातील त्याचा हा पहिला सामना होता. मात्र, या सामन्यात त्यांच्याकडून मोठी चूक झाली, ज्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली असून लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पंड्याला आर्थिक दंड

मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. यंदाच्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी खास राहिली नाही. एमआयने सलग दोन सामने गमावले आहेत. शनिवारी गुजरातने प्रथम फलंदाजी करत 196 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 197 धावांचे आव्हान मिळाले. पण लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयला 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा प्रकारे जीटी संघाने 36 धावांनी सामना जिंकला. या पराभवासोबत मुंबईला दुहेरी झटका बसला आहे. कर्णधार हार्दिक पंड्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. सामन्यातील स्लो ओव्हर-रेटसाठी पंड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शेवटचे षटक उशिरा सुरू

हार्दिक पंड्या 18व्या हंगामात जून्या चुकीची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. त्याने जीटीच्या डावातील शेवटचे षटक उशिरा सुरू केले. परिणामी मुंबई इंडियन्सने निर्धारीत 20 षटके वेळेत पूर्ण केली नाहीत. ज्यामुळे त्यांना गुजरातच्या डावाच्या शेवटच्या षटकात शिक्षा झाली. या षटकात एमआयला 30 यार्डच्या वर्तुळात एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागला. तसेच सामना संपल्यानंतर आर्थिक दंड ठोठावण्यात आला.

आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत प्रेस रिलीजनुसार, हार्दिक आणि एमआयसाठी ही हंगामातील पहिली चूक आहे, त्यामुळे कलम 2.2 नुसार त्यांच्यावर 12 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

चुकीची पुनरावृत्ती

मागील हंगामात मुंबईच्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पंड्याला स्लो ओव्हर रेटमुळे 1 सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो 2025च्या हंगामातील पहिला सामना खेळू शकला नाही. मात्र, पुनरागमनाच्या सामन्यातच त्याने यापूर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT