स्पोर्ट्स

IPLमध्ये ‘या’ 5 कोट्यधीश खेळाडूंचा उडाला फज्जा! अर्धा हंगाम संपला तरी मैदानातून ‘गायब’

IPL 2025 : अजून एकही सामना खेळला नाही

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025)ने जवळपास अर्धा हंगाम पूर्ण केला आहे. या मेगा इव्हेंटमध्ये रोमांचक सामने खेळले जात आहेत, ज्यामुळे स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात काही खेळाडूंना मिळालेल्या प्रचंड किमतीची खूप चर्चा झाली होती. त्यातील काही खेळाडूंनी आपल्याला मिळालेल्या रकमेची योग्य कामगिरीने परतफेड केली आहे, तर काही खेळाडूंचा फज्जा उडाला आहे.

यामध्ये काही असेही खेळाडू आहेत, ज्यांना मोठी रक्कम मिळालेली असूनही ते अजून मैदानात उतरलेले नाहीत. यामागे त्यांच्या दुखापतीपासून ते खराब फिटनेस, संघातील संयोजन किंवा अन्य कारणे आहेत. खरेतर, अनेक महागडे खेळाडू असे आहेत, ज्यांनी अजूनही या हंगामातील पहिला सामना खेळलेला नाही. जाणून घेऊया अशाच काही खेळाडूंविषयी, ज्यांना किमान दोन कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळालेली आहे, पण ते अद्याप त्या-त्या संघाच्या प्लेईंग 11 चा भाग नाहीत.

मयंक यादव (11 कोटी - लखनौ सुपर जायंट्स)

मयंक यादवने IPL 2024 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तो नियमितपणे 150 किमी प्रति तासाहून अधिक वेगाने गोलंदाजी करत होता. त्याने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलग ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकून एक विक्रम प्रस्थापित केला. त्याने केवळ चार IPL सामने खेळल्यानंतर भारताच्या टी-20 संघातही पदार्पण केले. त्याच्या क्षमतेची दखल घेत लखनौ सुपर जायंट्सने त्याला तब्बल 11 कोटी रुपयांत रिटेन केले. मात्र, दुखापतीमुळे हा तरुण वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाबाहेर राहिला आहे. तो अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगली बातमी अशी आहे की, मयंकने BCCI कडून परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघात पुनरागमन केले आहे. तो लवकरच मैदानात उतरण्याची अपेक्षा आहे.

टी. नटराजन (10.75 कोटी - दिल्ली कॅपिटल्स)

टी. नटराजन हा बुमराहनंतरचा यॉर्कर्ससाठी प्रसिद्ध वेगवान गोलंदाज आहे. तो डावखुरा असून त्याने गेल्या वर्षी हैदराबादसाठी दमदार कामगिरी केली होती. त्या हंगामात नटराजन 19 बळी घेऊन संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. याच प्रभावी कामगिरीमुळे यंदाच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 10.75 कोटी रुपयांत खरेदी केले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या हंगामात त्याने अजूनही पहिला सामना खेळलेला नाही. असे मानले जात आहे की नटराजन अजून 100 टक्के तंदुरुस्त नाही.

जेकब बेथेल (2.60 कोटी - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)

जेकब बेथेल या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूला आरसीबीने विकत घेतले होते. इंग्लंडसाठी तीनही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो चर्चेत आला. डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू बीथेलने त्याचा शेवटचा सामना यावर्षी भारताविरुद्ध नागपुरात खेळला होता. आरसीबीने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत, पण परदेशी खेळाडूंमध्ये व्यवस्थापनाने लिविंगस्टोन आणि रोमारियो शेफर्डवर विश्वास ठेवल्याचे पहायला मिळत आहे.

जेराल्ड कोएट्झी (2.4 कोटी - गुजरात टायटन्स)

कोएट्झी या दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजाला गुजरात टायटन्सने विकत घेतले. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्या वेळी कोएट्झीने 10 सामन्यांमध्ये 13 बळी घेतले होते. मात्र यंदा त्याला अजूनही गुजरात टायटन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. गुजरातने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. हा संघ सध्या ज्या संयोजनात खेळतो आहे, ते पाहता व्यवस्थापन लवकरात लवकर काही बदल करेल असे वाटत नाही.

रहमनुल्ला गुरबाज (2 कोटी - कोलकाता नाईट रायडर्स)

अफगाणिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज रहमनुल्ला गुरबाज 2023 पासून केकेआरसोबत आहे. मेगा लिलावात त्याला पुन्हा दोन कोटी रुपयांत संघात घेतले गेले. मागील दोन हंगामांमध्ये सर्व 14 सामने खेळल्यावरही, यंदा त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. केकेआरने क्विंटन डी कॉकला प्राधान्य दिले आहे, ज्याने आतापर्यंत ठीकठाक कामगिरी केली आहे. जोपर्यंत डी कॉकचा फॉर्म खालावणार नाही, तोपर्यंत गुरबाजला खेळण्याची संधी मिळणे खूपच अवघड दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT